श्रावणी सोमवारवरही कोरोनाचा परिणाम; मार्लेश्वरला दर्शनबंदी

श्रावण मासात मार्लेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पण, कोरोनामुळे मात्र या ठिकाणी येण्यास भाविकांना बंदी आहे. परिणामी आता इथला व्यवसाय बुडाला असून लाखो रुपयांच्या उलाढालींवरही परिणाम झाला आहे. मंगळवार 21 जुलै रोजी श्रावण मास सुरू होत असून या कालावधीत प्रथमच मार्लेश्वर भक्तांना दर्शनापासून अलिप्त रहावे लागणार आहे.

श्रावणातील सोमवार म्हटलं की, भाविक मोठ्या प्रमाणात शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. पण, यंदा मात्र भाविकांना त्याठिकाणी जाता येणार नाही आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान. महादेवाचं स्वयंभू असं तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वरमध्ये श्रावणात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. पण, यंदा मात्र भाविकांना या ठिकाणी येता येणार नाही. कोरोनामुळे देशातील देवस्थाने बंद आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख जवळील मार्लेश्वर हे देवस्थान भक्तांसाठी बंद आहे. या ठिकाणी दररोज शंभू महादेवाची पूजा आणि आरती मात्र नित्य होत आहे. पण, भाविकांची होणारी गर्दी मात्र थांबली आहे. जिल्हाधिकारी आणि न्यास याबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हे देवस्थान भक्तांना दर्शनासाठी खुलं करता येणार नसल्याची माहिती तिथल्या पुजाऱ्यांनी दिली आहे. शिवाय या ठिकाणी असलेल्या दुकानदारांवर देखील कोरोनाचा परिणाम होताना दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील मारळ या गावी मार्लेश्वर हे देवस्थान येते. दररोज या ठिकाणी हजारो भाविक येतात. पण, श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे देवस्थान भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी जवळपास शंभर दुकाने आहेत. त्या ठिकाणी प्रसाद, ओटी, नारळ, हार-फुले शिवाय जेवणाची सोय केली जाते. पण, यंदा मात्र हे सारे ठप्प आहे. वर्षाच्या इतर दिवसांची तुलना करता श्रावण महिन्यातील या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यावरच इथला रोजगार आणि उलाढाल अवलंबून असते. पण, यंदा मात्र सारे ठप्प आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सध्या दुकाने बंद आहेत. आतापर्यंत आम्ही कसेबसे दिवस काढले. शेती केली. या दुकानांवरच आमचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. पण, आता मात्र यापुढे अवघड होणार आहे. किती काळ आणखी जाईल माहित नाही. दुकानं बंद असल्यामुळे आम्हाला आता मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेकडो जण काम करत आपलं पोट भरतात. पण, आता काय करायचे? हा प्रश्व आम्हाला सतावत असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणचे दुकानदार रुपेश सावंत यांनी ‘सामना’कडे बोलतांना व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या