।। श्री साई गाथा ।। भाग १ ला

 >>विवेक दिगंबर वैद्य

‘संतांची मांदियाळी’ हे महाराष्ट्रदेशाचे वैभव आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यास दिग्गज अन् श्रेष्ठ अशा अनेकविध संतसत्पुरुषांचा सहवास लाभलेला आहे. कुणा एका महानुभावास विचारण्यात आले, “परमेश्वर श्रेष्ठ की गुरू श्रेष्ठ?’’ त्यावर महानुभाव चटकन् उद्गारले, “निःसंशय, ‘गुरू’ हाच श्रेष्ठ!!!’’ कारण या जगतात ‘सद्गुरू’वाचून सर्वकाही व्यर्थ आहे. हे ‘सद्गुरू’तत्त्व कोणत्या रूपात आणि कशा रीतीने लाभेल हे कुणासही आजवर सांगता आले नाही, कारण ‘गुरुतत्त्व’ ही अनुभवण्याची गोष्ट आहे. गुरुतत्त्वाचे महत्त्व प्रचीतीशिवाय जाणून घेणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीमुळे भक्तजनांच्या प्रत्ययास अनेक ‘सद्गुरू’ आले. त्यामधील महत्त्वाचे नाव अर्थात, शिर्डीचे ‘श्रीसाईबाबा’.

अदमासे पावणे दोनशे वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील, राहता तालुक्यातील शिर्डी नावाच्या एका आत्यंतिक आडवळणी खेडेगावात एक पोरगेलासा साधू एका देवळाच्या आश्रयाने राहिला आणि तिथेच कायमचा वसती करता झाला. इथूनतिथून येणाऱ्या फिरस्त्या, भटक्या व अनोळखी मुशाफिरांकडे गावकरी मंडळींनी जितके दुर्लक्ष करावयास हवे तितकेच दुर्लक्ष या कफनीधारी साधूविषयी करण्यात आले. त्याचं शिर्डीमधलं अस्तित्व काहींना खुणावत होतं, काहींना सलत होतं, तर अनेकांच्या ते खिजगणतीतदेखील नव्हतं.

त्या साधुपुरुषाला स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याची गरजही नव्हती आणि घाईदेखील नव्हती. रस्त्याने येणारे-जाणारे कधी त्यास दयाबुद्धीने खाऊ-पिऊ घालत. जवळच रहदारीचा रस्ता असल्याकारणाने मालवाहतूक करणारी मंडळी त्यांच्या शिदोरीतील भाकर-तुकडा त्याच्या दिशेने सरकवत, तर कुणी त्याच्या समोर चहाचा पेला आणून ठेवत. नाही म्हणायला तो कधीकधी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने गावात जात असे. जे काही झोळीत पडेल (मग तो शिधा असो वा कुणाच्या शिव्या) ते स्वीकारावं आणि ‘अल्ला मालिक’ म्हणून पुढे निघावं असा त्याचा नित्यक्रम झाला होता.

अशातच कित्येक दिवस अन् कित्येक महिने सरले. शिर्डीकरांचे व्यवहार नित्यनेमानुसार चालू होते. एके दिवशी मात्र या संथ वातावरणात चैतन्य यावे अशी घटना घडली. चावडीवरच्या मंडळींनी शिर्डीच्या दिशेने काही बैलगाडय़ा येत असल्याचे दृश्य पाहिले. बैलगाड्यांच्या चाकांमुळे उठलेला धुरळा वेशीपर्यंत पोहोचण्याआधीच काही चौकस मुलांचे तांडे चावडीपाशी येऊन थडकले. सावरगावचे प्रख्यात सत्पुरुष श्रीआनंदनाथ महाराज येत असल्याचे वृत्त त्यांच्या तोंडून ऐकल्यावर जुन्याजाणत्या शिर्डीकरांनी कान टवकारले आणि एकाएकी तिथे कमालीची लगबग उडाली. सर्वत्र हाकारे दिले गेले.

anandnath-maharaj
श्री आनंदनाथ महाराज

षट्कर्णी झालेली ही गोष्ट निमिषार्धात ‘शतकर्णी’ झाली. पुरुषमंडळींची लगबग वाढली. नाथांच्या स्वागतासाठीची तयारी सुरू झाली. फुलं, निरांजन, श्रीफळ, मिष्टान्ने यांनी सजलेली तबके घेऊन सवाष्णी लगबगीने शिर्डीच्या वेशीपर्यंत पोहोचल्या. श्रीआनंदनाथांच्या स्वागतासाठी आतुर झालेला प्रत्येकजण त्यांचे प्रसन्न दर्शन घडताच भारावून जात होता.

अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ यांचे प्रिय शिष्य आनंदनाथ, स्वामीरायांच्याच आदेशानुसार शिर्डीस पोहोचले. श्रीआनंदनाथ गावामध्ये दाखल होताच अवतीभवतीची गर्दी अधिकच वाढली. नाथ मात्र समोरच्या गर्दीमध्ये कुणाचा तरी शोध घेत होते. काही वेळाने एकाएकी त्यांची दृष्टी समोर झाडाखाली बसलेल्या साधूवर स्थिरावली. नजरानजर झाली, दृष्टीभेट झाली, शोध संपला तशी आनंदनाथांनी लागलीच बैलगाडीतून खाली उडी घेतली. लगबगीने नाथ त्या दाढीधारी साधूपुरुषापर्यंत पोहोचले आणि त्यास आलिंगन देते झाले.

दोघांच्याही नेत्रांस पाझर फुटला होता, आनंदाश्रू घळाघळा वाहत होते. जन्मजन्मांतरीचा अंतराय अन् क्षणकाळाचा आवेग ओसरला तेव्हा गावकऱ्यांकडे पाहात श्रीआनंदनाथ उत्स्फूर्तपणे म्हणाले, “अहो, हिरा आहे हा प्रत्यक्ष. यास उकिरड्यावर टाकू नका. ही गारगोटी नव्हे हे लक्षात ठेवा.’’ श्रीआनंदनाथांनी त्या साधूकडे पाहिले, तेव्हा साधूच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य विलसत होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या