।। श्री साईगाथा ।। भाग ११ वा – साईभक्त बायजाबाई

41

विवेक दिगंबर वैद्य

शिर्डीवासीयांच्या भाग्याचे नवल ते काय वर्णावे? परमेश्वर त्यांच्याकरिता साक्षात मशिदीमध्ये नांदत होता आणि भिक्षेच्या निमित्ताने त्यांच्या अगदी दारापाशी येत होता. जगाचा उद्धार करण्यासाठी अवतरलेल्या या सत्पुरुषाने चौपदरी झोळी खांद्यावर घेऊन गावात जावे, ‘पोरी, आण गे चतकुर (पाव तुकडा) भाकरी’ असे म्हणत हाळी द्यावी आणि लगबगीने घरातील मंडळींनी साईंच्या झोळीत भिक्षा घालावी.

एका हाती टमरेल व दुसऱ्या हाती झोळी घेऊन बाबा दररोज काही ठरावीक घरात जात असत. कुणी भात, भाकरी दिली तर झोळी पसरत असत आणि कुणी भाजी, दूध, ताक वा कसलाही पातळ पदार्थ दिला तर टमरेल पुढे करीत असत. स्वाद, रस, गंध, रुची या साऱयांच्या पलीकडे गेलेले हे ब्रह्मतत्व मिळेल त्या भिक्षेचा निर्विकार मनाने स्वीकार करीत असे. मनात लालसा नसेल तर ‘चव घेण्याचा’ प्रश्न येतो कुठे? आणि रसनेचा, स्वादाचा अन् चवीचा मोह मनाला होणारच नसेल तर जिव्हेला तरी त्याचे सोयरसुतक कसे असणार? जे काही झोळीत पडत असे त्यास समाधानाने स्वीकारुन बाबा दुसऱया घराच्या दिशेने जात असत. बाबांची ही भिक्षाफेरी नियमित होती कां? तर त्याचेही उत्तर नाही असेच द्यावे लागेल कारण बाबा भिक्षेकरिता दिवसांतून कधी-कधी १०-१२ वेळा गावामध्ये जात असत.

गावात जावे, भिक्षा मागावी, भिक्षेच्या रूपाने टमरेल आणि झोळीमध्ये जे काही मिळाले असेल ते आणावे आणि मशिदीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका कुंडीमध्ये ओतावे. मग, त्या कुंडीत जे काही असे त्यावर कावळे, कुत्रे तुटून पडत, बाबांनी कधी कुणाला हटकले नाही. मशीद आणि अंगण झाडायला येणारी बाईसुद्धा त्यातून आपला वाटा घेऊन निघून जात असे, मात्र बाबा तिलाही काही बोलत नसत. जो दयाळू सत्पुरुष प्राण्याला वा पक्ष्याला हडहड करीत नाही तो गोरगरीबाला तरी मज्जाव कसा करणार?

या व अशा वागण्यामुळे साईबाबांविषयीची अनेक भिन्न मते शिर्डी व पंचक्रोशीत प्रवाहित झाली होती. काहींच्या मते तर साई नावाच्या फकिराचा हा शुद्ध वेडगळपणा होता. भाकर-तुकडा मागून जो आपला निर्वाह चालवितो, मात्र त्याचवेळी जे काही भिक्षेच्या रूपाने प्राप्त झाले, त्यास स्वतःपाशी न ठेवता सढळ हाताने इतरांमध्ये वाटूनही देतो त्यास ’वेडा’च म्हणावे लागेल, मात्र बाबांच्या या वरकरणी वेडसर वाटणाऱ्या कृत्यामागे समस्त गोरगरिबांविषयीची दयाबुद्धी आणि परोपकाराची भावना ठासून भरली होती हे लक्षात घ्यावे लागेल.

बाबांच्या वागण्याचा विपर्यास करणारे अनेकजण शिर्डीत नांदत होते मात्र शिर्डीमध्ये, त्यांना जाणून घेणारी एक व्यक्ती अशीही होती, जिने साईबाबांवर अतोनात माया केली, अपार प्रेम केले. बालवयामध्ये शिर्डीत आल्यापासून ते पुन्हा येथे आगमन करते झाले तोवर साईबाबांवर अतिशय प्रेम करणारी आणि निगुतीने त्यांचा सांभाळ करणारी ती व्यक्ती म्हणजे बायजाबाई, तात्या कोतेपाटलाची ही आई. भर दुपारी, कोसो मैल अंतर तुडवीत, जंगलातील घनदाट झाडाझुडपांचा अडथळा पार करून, डोक्यावरील टोपलीतून भाकऱ्या व भाजी घेऊन बायजाबाई बाबांकडे जात असे. बाबा जिथे कुठे असतील तिथून त्यांना हुडकून काढत त्यांस जेवू घालत असे. बाबांबद्दल तिला अपार माया होती. बाबांमधील देवत्व जाणणाऱया शिर्डीतील काही जुन्याजाणत्या मंडळींपैकी एक म्हणजे बायजाबाई कोतेपाटील.

स्वहस्ते केलेली भाजी-भाकरी बाबांना खाऊ घालेपर्यंत बायजाबाईंना चैन पडत नसे. बाबा मशिदीत स्थिर होईपर्यंत हा क्रम नित्यनेमाने चालू होता. अखेरीस बायजाबाईंचे कष्ट वाचविण्यासाठी साईबाबा गावात येऊन राहिले आणि मशिदीत स्थिर झाले. साईंनी देह त्यागेपर्यंत त्यांचा सहवास बायजाबाईंना लाभला. अखेरीस ‘नवविधा भक्तीची’ प्रतीकात्मक आठवण या रूपाने बाबांनी त्यांच्या लाडक्या माईला ‘नऊ’ नाणी दिली. ही नाणी आजही आपणांस पाहावयास मिळतात. कोतेपाटील कुटुंबीयांनी प्रथमपासूनच साईबाबांवर जिवापाड प्रेम केले आणि बाबांनीदेखील या मंडळींची ‘स्वतःचे’ गणगोत असल्यागत काळजी वाहिली. धन्य ती माऊली, धन्य तिचे वात्सल्य.

 

आपली प्रतिक्रिया द्या