।। श्री साईगाथा ।। भाग १२ वा – ‘अनाकलनीय’ साईनाथ

118

– विवेक दिगंबर वैद्य

कुण्या भक्ताने दिलेले ‘जाते’ आणि धान्य यांचा मेळ घालून साईबाबा सकाळच्या सुमारास मशिदीमध्ये दळण दळावयास बसले. त्यांनी पोत्यातील गहू सुपात काढून घेतले, जमिनीवर पोते अंथरून त्यावर जाते ठेवले आणि बाह्या वर सारत, कफनीचा घोळ आवरत, एक पाय दुमडलेला व दुसरा पाय पसरलेल्या अवस्थेत बाबांनी बैठक घातली आणि दळणकामास सुरुवात केली. पाहता पाहता जात्याभोवती गव्हाचे पीठ बऱ्यापैकी जमू लागले.

बाबांबद्दल काय सांगावे? आजवर अनेक साधुसंतांच्या लीला श्रवण केल्या, अनुभवल्या मात्र एखाद्या संसारी गृहस्थाप्रमाणे प्रापंचिक कार्यातून परमार्थाचा मोक्षमार्ग दाखविणारा साईबाबांसारखा मोक्षगुरू निराळाच. बाबांच्या या अकल्पित कार्याचे विश्लेषण करणे तर दूरच, त्यांच्या वरकरणी साध्या वाटणाऱ्या कृतीचा अर्थ लावणे देखील सर्वसामान्य भक्तांकरिता कठीण व अवघड गोष्ट आहे. असो.

sai-baba

बाबा सकाळपासून दळण दळीत आहेत ही वार्ता गावामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली तशी अनेक साईभक्त हातातील कामे अर्धवट टाकून धावतपळत मशिदीकडे निघाले. काही साईभक्तांनी दळण्याची सेवा आपणांकडे द्यावी अशी बाबांना विनंती केली मात्र बाबांनी त्यांस नकार दिला. मात्र त्याचवेळी काही स्त्रिया लगबगीने मशिदीत शिरल्या, त्यांनी बाबांकडे मोर्चा वळवला व त्यांच्याकडून जाते काढून घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यावर बाबा संतापले व त्यांना ओरडू लागले मात्र त्या स्त्रिया बधल्या नाहीत. त्यांनी बाबांना दूर सारले आणि जात्याचा खुंटा हिसकावून घेतला. बाबा संतापाने त्यांच्यासोबत भांडू लागले, मात्र बाबांच्या ‘रागा’चा त्या स्त्रियांवर जराही परिणाम झाला नाही. त्या शांतपणे दळत होत्या आणि दळताना बाबांचे गुणगान करणारी पदे म्हणत होत्या. त्यांच्या या अवचित भक्तीमुळे बाबा संतोषले. त्यांचा उसना राग शांत झाला आणि ते गालातल्या गालात हसू लागले. बाबांचे मानस आणि कार्यकारणभाव खुद्द बाबाच जाणोत!!!

सुपामधील सर्व धान्य दळून झाले होते. जवळपास पायलीभर पीठ जमा झाले. त्या गव्हाच्या पिठाकडे पाहून बायकांची बुद्धी एकाएकी पालटली. ‘साईबाबा तर फकिरीवृत्तीचे सत्पुरुष, त्यांना एवढे पीठ काय करायचे?’ असा प्रश्न त्या स्त्रियांच्या मनात आला. बाबा स्वतः जेवण बनवीत नाहीत. गावामध्ये फिरून भाकरीतुकडा गोळा करतात. त्यांना ना बायको, ना संसार, ना पोर ना टोर, मग त्यांना या पिठाची काय गरज भासावी? त्यामुळे त्यांनी दळलेले हे पीठ बहुधा आपल्यासाठीच असणार असा समज त्या बायकांनी करून घेतला.

गहू दळून झाले तशी जाते भिंतीला टेकवून पुढे त्या चारही बायकांनी एका पोत्यावर पीठ पसरले व त्याचे प्रत्येकीसाठी चार भाग केले व प्रत्येकीने आपआपला वाटा घेऊन घरी निघण्याची तयारी केली. त्या बायकांचे हे कृत्य पाहून बाबा चांगलेच संतापले आणि त्यांच्यावर कडाडले, ‘चळल्यात का? कुठे नेता पीठ? बापाचा माल आहे का घेऊन जायला? जा, गावच्या वेशीवर जाऊन तिथे हे पीठ पसरवा. लगेच धावत आल्या, मला लुटायला आल्यात. हे गहू काय तुमच्याकडून उसने घेतले होते की त्याचे पीठ तुम्ही नेऊ पाहता?’

बाबांचा आक्रमक अवतार पाहून त्या बायका घाबरल्या. आपल्या मनातला हेतू बाबांनी ओळखला याची जाणीव होताच त्या स्त्रिया वरमल्या आणि फजीत पावल्या. अखेरीस बाबांच्या सूचनेनुसार व आज्ञेनुसार त्या बायांनी पीठ घेतले आणि शिर्डीच्या वेशीवर नेऊन पसरले. भल्या सकाळी गव्हाचे पीठ करून घ्यावे आणि त्यानंतर ते पीठ गावच्या वेशीवर सर्वत्र पसरावे या कृतीचा अर्थ कुणास व कसा समजावा? मात्र हेमाडपंतांनी या कृतीचा अर्थ साईभक्तांस विचारला असता तेथे उपस्थित भक्तमंडळी सांगती झाली की, ‘त्या समयी गावात महामारीची साथ होती, त्या रोगराईची लागण गावांस, गावकऱ्यांस होऊ नये म्हणून साईनाथांनी वेशीवर पीठ पसरून बाहेरून येऊ पाहणाऱ्या आकस्मिक संकटाचा पुरता बीमोड केला आणि गावांस शांतता व आरोग्य लाभू दिले.’

आपली प्रतिक्रिया द्या