।। श्री साईगाथा ।। भाग १३ वा – मोक्षगुरू साईनाथ

236
  • विवेक दिगंबर वैद्य

के दिवशी दुपारी मशिदीमध्ये आरती झाल्यावर भक्तमंडळी आपल्या मुक्कामी परतणार इतक्यात एकाएकी बाबा उत्स्फूर्तपणे बोलते झाले, ‘तुम्ही कुठेही असा, काहीही करा, परंतु नेहमीच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही कृत्य करता, त्याची प्रत्येक खबर मला समजते. माझे तुमच्याकडे लक्ष आहे. मी चराचर सृष्टीचा चालक आहे, उत्पन्नकर्ता आहे. मीच इंद्रियांना चालवितो आणि त्यांचे दमनही करतो. मीच कर्ता, धर्ता आणि संहारकर्ता आहे. जो नित्य माझ्याकडे लक्ष देऊन असतो, त्यास कळीकाळाचे भय राहात नाही. त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. मात्र, ज्याला माझा विसर पडतो त्यास मायेच्या बंधनात अडकवून त्याच्यावर मी चाबकाचे फटकारे ओढतो. मी सर्वांच्या अगदी जवळचा, सर्वांच्या हृदयात वास करणारा, सर्वत्र आणि सर्वकाही व्यापून उरलेला असा सर्वांचा ‘स्वामी’ आहे.’

13-saibaba-1

शिक्षा, छंदस्, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प अशी सहा शास्त्रे ज्याच्यासमोर कवडीमोल आहेत, असा हा ‘साई’. सांख्य योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदांत अशी षड्दर्शने ज्याच्यासमोर नतमस्तक होतात, असा हा ‘साई’. ज्याचे वर्णन करताना परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी थकल्या असा हा ‘साई’. जेथे वेदांचे ‘चातुर्य’ थिटे पडले आणि ‘पुराणांनी’ हार पत्करली असा हा ‘साई’, सर्वसामान्य भक्तांसाठी केवळ हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहे. आपल्या भक्तांचा योगक्षेम चालविण्याची जबाबदारी ज्याने स्वतःहून पत्करलेली आहे अशा भक्तवत्सल साईंविषयी प्रत्येकाच्या मनात भक्तिभाव जागृत होणे हेच या लेखनामागचे ‘सूत्र’ आहे.

‘साई’ नावाचे ‘दैवत’ आहे तरी कसे? सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वीतलावर ते का व कसे अवतरले? संसारदुःखात बुडालेल्या भक्तांचा कैवारी होण्यासाठी त्यांनी ‘देह’ का झिजवला? जननिंदा आणि दूषणे यांचा सामना करीत हा फकीर पडक्या मशिदीत बसून, कधीही रिकाम्या न होणाऱ्या त्याच्या ‘सुप्रसिद्ध’ टमरेलातून कृपेचा अखंड वर्षाव का करीत राहिला? भक्तांच्या हातून कळत नकळत घडणाऱ्या चुकांवर हातातील सटक्याचा प्रहार करीत त्यांना पुन्हा तितक्याच मायेने स्वतःजवळ घेणारा हा ‘साई’ नेमका आहे तरी कसा? हे गूढ आजवर अनेकांना गवसले नाही! ज्यांना गवसले त्यांना ते नीटपणे उलगडून दाखवणे शक्य झाले नाही. ज्यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला त्यांची मती गुंग झाली. मात्र ज्यांनी आपली गती, मती आणि भीती साईचरणांवर सहजपणे अर्पण केली त्यांना साईंची कृपा भरभरून प्राप्त झाली हे मात्र गमतीशीर आहे आणि त्याच वेळी विचार करावयास भाग पाडणारे आहे.

साईरूपातील परमेश्वराला कशाचीही आसक्ती नाही. कुणाची भरभराट वां कुणाचा ऱहास झाला तरी त्याची पर्वा नाही. त्यांचे अंतःकरण आरशासारखे पारदर्शक आणि निर्मळ आहे. त्यांच्या वाणीतून नेहमीच दुसऱयास आनंद देणारे मधुर संभाषण प्रकटते. त्यांच्या नजरेतील कारुण्यामधून वात्सल्य पाझरते. त्यांच्या दृष्टीला राजा वा रंक, श्रीमंत वा भिकारी सारखाच भासतो. मान किंवा अपमान यांमध्ये साई गुंतून राहात नाहीत. औदार्यांमध्ये सर्वाधिक उदार व साऱया धर्मग्रंथाचे ‘सार’ असलेले हे साई अंतर्बाह्य निर्मळ आहेत.

साईबाबा शिर्डीत येणाऱ्या भक्तजनांशी निवांतपणे गप्पा मारतात. गप्पा मारताना अनेकानेक गोष्टी सांगतात व हास्यविनोदात रमतात, घरच्या मंडळींची चौकशी करतात, कुणा गरजवंताला पै-पैका देतात, कुणाच्या लहानग्या लेकरांसोबत खेळ खेळतात. कधी ते मुरळ्यांचे नाचगाणे पाहतात, गजल वा गाणे ऐकताना तल्लीन होतात. सर्व जग झोपी गेले तरी हे मात्र जागे राहतात. ते मशिदीला द्वारकामाई म्हणतात आणि हिंदू भक्तांना ‘अल्ला मालिक’ म्हणून भरवसा देतात. जेवणाखाण्याविषयी उदासीन असणारे साई कधीकधी भिक्षेसाठी दिवसांतून अनेकदा गावात फेऱ्या मारतात. पै-पैशाचा हिशोब ठेवतात आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टीच्या खरेदीचा व्यवहार रास्त दराने करतात.

प्रश्न हा आहे की, जे प्रपंच आणि परमार्थाच्या जगामध्ये सारख्याच सहजतेने वावरतात त्या साईबाबांना आपण कसे ओळखायचे?

आपली प्रतिक्रिया द्या