।। श्री साईगाथा ।। भाग १४ वा – श्रद्धा आणि सबुरी

824

सुरुवातीच्या काळात साईबाबा वैद्यकी करीत असत. त्यांच्या हातून मिळणारे औषध रोग्याला नवसंजीवनी देणारे असे. त्यामुळे साधू व सत्पुरुष यांसोबत बाबांना ‘हकीम’ ही उपाधीसुद्धा लाभली होती. शिर्डीतील बहुतांश मंडळी बाबांच्या वास्तव्यामुळे निर्धास्त झाली होती. कुणाचे पोर किरकिरले की त्यास बखोटीस मारून बाबांपाशी आणावे, मग बाबा त्या पोराच्या मस्तकावर उदी टेकवत आणि प्रसादाच्या रूपाने जे काही समोर दिसेल ते बाळमुठीत सरकवत. साक्षात परमेश्वराचा स्पर्श लाभल्यावर पोराचा आजार पळून जात असे, शिवाय प्रसादाचा लाभ झाल्याने पोरगेही खूश होत असे.

14-saibaba

एकदा एका भक्ताचे डोळे सुजून लाल झाले. वैद्य, हकिमांचा उपाय चालेना. त्या भक्ताची साईबाबांवर विलक्षण श्रद्धा असल्याने ते लागलीच बाबांपाशी आले. बाबांनी कुणा भक्ताकडून बिब्बे ठेचून घेतले आणि त्या भक्ताच्या डोळ्यांत बिब्याचा गोळा भरून त्यावर फडके गुंडाळले. दुसऱ्या दिवशी बाबांनी त्या भक्ताच्या डोळ्यांवरील पट्टी सोडून डोळ्यांवर पाण्याची धार धरली व नंतर त्या भक्तास डोळे उघडण्यास सांगितले तेव्हा डोळ्यांस आलेली सूज पूर्णपणे निवळून बुबुळे स्वच्छ झाली होती. वास्तविक पाहता डोळ्यासारख्या नाजूक अवयवामध्ये बिब्बे सारणे हेच धाडसाचे काम, मात्र निष्ठावंत भक्ताने साईंचा ‘श्रद्धा व सबुरी’चा मंत्र जपला आणि तो व्याधीमुक्त झाला.

एकदा बाबांनी एकाएकी धुनीत हात खुपसले व ते निवांत बसले. हे दृश्य पाहून माधवरावांनी बाबांना कमरेस धरून मागे ओढले तेव्हा बाबा म्हणाले, ‘अरे, एका लोहाराची पोर तिच्या आईच्या कडेवरून चुकून सांडली व भट्टीत पडली म्हणून तिला वाचवण्यासाठी आगीत हात घातले. माझे हात भाजले तरी पोर वाचली हे महत्त्वाचे.’ बाबांचे वात्सल्य अशा अनेक उदाहरणांतून दिसून येते.

दादासाहेब खापर्डे यांच्या ग्रंथीज्वर झालेल्या मुलाची व्याधीदेखील बाबांनी दूर केली. त्याच्या अंगावर उठलेल्या ज्वराच्या गाठी बाबांनी स्वतःच्या देहावर ओढवून घेतल्या व त्या लहानग्याच्या प्राणावर बेतलेले संकट निभावले. बाबांच्या कृपाप्रसादाने अनेक भक्त व्याधीमुक्त झाले. कुणाचा कुष्ठरोग बरा झाला, कुणा पांगळ्यास चालता येऊ लागले, कुणाचा ताप व भ्रम दूर झाला, कुणाचे गंडांतर टळले, कुणाचे वेड व भ्रांती निमाली, कुणास अपत्यप्राप्ती झाली तर कुणास ‘मोक्ष’देखील प्राप्त झाला. बाबांची ‘उदी’ ही श्रद्धाभावनेचे प्रतीक आहे. बाबांच्या उदीने ‘अशक्य ते शक्य’ करून दाखविल्याच्या अनेक कथा साईचरित्रात दिलेल्या आहेत.

बाबांच्या लीला आणि अवतारकार्य अनेक चमत्कारिक घटनांनी व्यापलेले आहे. बाबा बरेचदा धुनीजवळ बसत असत. मलमूत्रादी विसर्जन व स्नानविधी आटोपल्यानंतर अनेकदा ते कुणाशीही न बोलता, ध्यानस्थ स्थितीत धुनीपाशी एकटक पाहात बसल्याचे अनेकांनी पाहिले होते. बाबा योगमार्गामध्ये माहीर होते. भक्तांची नजर चुकवून अनेकदा आंघोळ करण्याच्या बहाण्याने ते पोटातील आतडी ओकून बाहेर काढत आणि धुऊन वाळवीत असत. मशिदीपासून दूर अंतरावर वडाच्या झाडापलीकडे भर दुपारी इतस्ततः कुणी नसताना बाबा हे प्रयोग करीत असत. आतडी स्वच्छ धुऊन जांबाच्या झाडावर पसरून ठेवत असताना त्यांना अनेकांनी पाहिले होते. इतकेच नाही तर कधीकधी खंडयोगाची क्रिया करून धडापासून शरीराचे बाकीचे अवयव ते वेगळे करीत असत.

एकदा कुणी एक भक्त साईदर्शनार्थ गेला असता त्याला मशिदीच्या चारही कोपऱ्यात बाबांच्या शरीराचे वेगवेगळे अवयव इथेतिथे पडलेले दिसले. हे दृश्य पाहून त्या भक्ताची बोबडीच वळली. त्यास वाटले की कुणा दुष्टाने बाबांना ठार मारले असावे. घाबरलेला तो भक्त कुणासही न सांगतासवरता माघारी परतला. मात्र, दुसऱ्या दिवशी उत्सुकतेपोटी तो जेव्हा मशिदीत परतला तेव्हा बाबा त्याला तेथे प्रसन्न मुद्रेने बसल्याचे दिसून आले. हे पाहून तो भक्त चांगलाच चक्रावला. अर्थात बाबांची योगमार्गातील श्रेष्ठत्व दाखवण्यासंबंधीची ही कथा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या