।। श्री साईगाथा ।। भाग १५ वा – साईकृपांकित तात्या कोते

204

विवेक दिगंबर वैद्य

साईबाबांभोवती जेव्हा चमत्कारांचे वलय निर्माण झाले नव्हते, केवळ ‘फकीर’ या उपाधीने त्यांची जोपर्यंत बोळवण करण्यात येत होती, त्यांचे ‘असणे’ वा ‘नसणे’ शिर्डीमध्ये जोवर कुणालाही महत्त्वाचे वाटत नव्हते त्या काळामध्ये बायजाबाई व तिचे पती या कोते-पाटील दांपत्याने साईबाबांचा सांभाळ केला, त्यांच्यावर मायेचे कृपाछत्र धरले. शिर्डीसारख्या आडवळणी गावात ज्या कुणा दोन-चार मंडळींनी साईबाबांना खऱ्या अर्थाने स्वीकारले होते, त्यामध्ये कोते-पाटील कुटुंब अग्रस्थानावर होते.

शिर्डीत स्थिरावण्याच्या काळात बाबा एकतर निंबवृक्षाखाली बसत नाहीतर जंगलात दूरवर भटकत असत, तेव्हा कोसो अंतरावर पायपीट करून बायजामाऊली साईंना हुडकून काढत असे व त्यांस भाजी-भाकरी देत असे. साईंवरील हे अपार प्रेम व अविचल निष्ठा बायजाबाईंच्या मुलामध्ये, तात्या कोते-पाटील यांच्यामध्येही उतरली होती. तात्या कोते यांना तब्बल चौदा वर्षे साईसहवास लाभला.

15-tatya-kote
प्रारंभिक काळात म्हाळसापती आणि तात्या हेच काय ते साईंचे जीवलग साथीदार व स्नेही सोबती होते. या दोघांच्याही भाग्याचे वर्णन ते काय करावे! हे दोन्ही भाग्यवंत बाबांच्या सहवासाचे पुण्य एकसमान उपभोगीत होते. तात्या व म्हाळसापती बाबांसोबत पडक्या मशिदीतच झोपत असत. तात्यांचे आई-वडील वृद्ध होते; मात्र प्रसंगी त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करून तात्यांनी संपूर्ण रात्र साईंच्या दिव्य सहवासात घालवावी ही तात्यांसाठी कित्येक जन्मांची पुण्याई होती. नवल म्हणजे, तात्यांच्या वृद्ध माता-पित्यांनीही त्यास हरकत घेतली नाही. पुढे तब्बल चौदा वर्षांनी जेव्हा तात्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर तात्या व साईबाबा यांचा ऋणानुबंध संपुष्टात आला. कर्ता पुरुष हरपल्यानंतर खांद्यावर आलेली घराची जबाबदारी आणि पुढे लग्न-संसारात गुरफटल्यामुळे पत्नी, बायजामाई व घर यांना सोडून प्रत्येक रात्री साईसेवेस येणे तात्यांना जमले नाही. अर्थातच साईंनाही हे मंजूर होतेच.

जेव्हा तात्या व म्हाळसापती साईंसोबत असत तेव्हाचा काळ मात्र मौजेचा होता. रात्री हे तिघेजण मशिदीत विश्रांती घेत असत. पूर्व, पश्चिम व उत्तर अशी तीन दिशांना तिघांची डोकी असत व पाय एकमेकांच्या पायांना भिडवलेले असत. गोणपाटावर पाठ टेकली तरी कुणास झोप लागत नसे. रात्री उशिरा बराच काळपर्यंत गप्पागोष्टी चालत असत. त्यातल्या कुण्या एखाद्यास डुलकी लागली तर दुसऱ्याने त्यास जागे करावे. कधी तात्यास झोप येऊन ते मोठ्यांदा घोरू लागले की बाबांनी एकाएकी त्यांस उठवावे व दांडगाईने उलथापालथा करून त्यांचे डोके दाबावे किंवा म्हाळसापतींना सोबत घेऊन त्या दोघांनी तात्यांना आवळून धरावे, त्यांचे पाय दाबावे किंवा त्यांची पाठ रगडावी. आहाहा!!! काय तो भाग्ययोग आणि सेवाकार्याचा गौरव! साक्षात परमेश्वराने पाठ रगडावी, पाय चुरावे आणि गप्पागोष्टी कराव्या इतके सहजभाग्य तात्या कोतेंना लाभले होते. तात्यांच्या वाट्याला साईमाऊलींचे अपार कौतुक आले. तात्या खऱ्या अर्थाने साईकृपांकित होते. त्यांचा योगक्षेम साईबाबांनी स्वेच्छेने स्वीकारला होता याचा प्रत्यय देणारी आणखी एक कथा.

एकदा तात्या कोपरगाव येथे आठवडी बाजाराकरिता निघाले असता बाबांच्या दर्शनार्थ मशिदीत आले. त्यांची बाहेर जाण्याची लगबग पाहून बाबांनी त्यांना बजावले, ‘थोडा थांब. बाजार राहू दे. मग होईल. गावाबाहेर जाऊ नकोस.’ परंतु तात्यांची घालमेल कायम होती, हे पाहून अखेर बाबांनी तात्यांना शाम्याला सोबतीस नेण्याची सूचना केली. तरीही बाबांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून, शाम्यास न घेता तात्या बाजारास निघाले. मात्र, साईंची आज्ञा दुर्लक्षित करण्याचा परिणाम त्यांना तत्काळ जाणवला. थोडे अंतर पार केल्यावर तात्यांच्या टांग्याचा घोडा उधळला. टांगा पलटी झाला आणि तात्यांना जोराचा हिसका बसून त्यांच्या कमरेस लटका भरला. जिवावरचे संकट थोडक्यात निभावले असले तरी तात्यांना तेव्हा साईमाऊलींनी दिलेला धोक्याचा इशारा आठवला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

आपली प्रतिक्रिया द्या