।। श्री साईगाथा ।। भाग १८ वा – साईमंत्राचा महिमा

विवेक दिगंबर वैद्य

बाळासाहेब मिरीकर चिथळीच्या दौऱ्यावर जात असता त्यांच्यासोबत माधवराव देशपांडे यांना पाठवून साईबाबांनी ‘लांब बावा’ अर्थात भल्यामोठ्या सर्पापासून मिरीकरांचे रक्षण केले. माधवरावांशी गप्पा मारण्याच्या हेतूने मिरीकर जागे राहिले आणि त्यामुळेच तेथे अकस्मात आलेल्या सर्पाचे अस्तित्व उपस्थितांना जाणवले. माधवरावांमुळे मिरीकरांवरील संकट दूर झाले असले तरी खुद्द माधवराव देशपांडे मात्र अशा प्रकारे ओढवलेल्या अन्य एका आकस्मिक संकटातून केवळ साईंच्या कृपेमुळेच बचावले. त्याचा हा वृत्तांत.

एकदा माधवरावांच्या करंगळीला साप चावला. सर्पदंशामुळे विष पसरून करंगळीस जळजळ होऊ लागली. वेदना असह्य झाल्याने माधवराव देशपांडे भयभीत झाले. प्राण जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपल्याची त्यांना जाणीव झाली. तोपावेतो आप्त-स्नेही तिथे जमा झाले. कुणी त्यांना वीरोबाकडे नेण्याचे ठरविले तर नानासाहेब निमोणकर त्यांना दुखऱ्या भागावर उदी लावण्यास सांगू लागले. असे असतानाही शरीर लालेलाल झालेल्या अवस्थेत माधवरावांनी कुणाचेही न ऐकता मशिदीच्या दिशेने पळ काढला. बाबा मशिदीत बसले होते.

18-madhavrao-deshpande

मशिदीची पायरी चढणाऱ्या माधवरावांची आणि बाबांची नजरानजर झाली. त्यासरशी एकाएकी साईबाबा संतापाने लालेलाल झाले. माधवरावांकडे पाहत बाबा एकसारखे शिव्या देऊ लागले. त्यांना बहुधा माधवरावांना मशिदीत येऊ द्यायचे नसावे. मात्र तरीही माधवरावांनी मशिदीची पायरी चढण्याचा प्रयत्न केला असता बाबा एकाएकी मोठ्या आवाजात म्हणाले, “वर चढू नको भटुरड्या. चढशील तर खबरदार. चल निघ जा. खाली उतर.’’ बाबांनी पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि ते डोळ्यातून आग ओकू लागले.

हा अकल्पित आणि अचंबित करणारा प्रसंग पाहून माधवराव चांगलेच घाबरले आणि मटकन खाली बसले. त्यांचा धीर खचला. शेवटचा उपाय म्हणून ज्याच्याकडे यावे तो आपला देव आपल्यावर रागवावा याचे त्यांना दुःख झाले. बाबांचे ते खवळलेले रौद्ररूप, त्यांचे तारसप्तकातले बोलणे आणि शिवीगाळ ऐकून माधवरावांचा संयम संपला. त्यांना जगण्याची शाश्वती उरली नाही. मशीद हे आपले माहेरघर असताना व बाबांकरिता आपण त्यांचे पोटचे पोर असताना ही साईमाऊली आपल्यावर का रागावली असावी? साप चावल्याचे गाऱ्हाणे मी तिच्यासमोरच मांडणार ना? माऊलीने जर लाथेने ढकलले तर पोराने त्याचे केविलवाणे तोंड कुठे लपवावे? आईने जर मुलाचा त्याग केला तर लेकराने कुणाच्या तोंडाकडे पाहावे? माधवरावांचे बाबांशी असलेले आजवरचे माय-लेकरांचे नाते त्यांना संभ्रमात टाकते झाले.

आपला अंतःकाळ जवळ आल्याचे मान्य करत माधवराव तिथेच बसून राहिले. विचारांची गर्दी ओसरली होती. थोड्या वेळाने साईबाबादेखील शांत झाले. माधवरावांचाही धीर चेपला. तशी बाबांकडे जात माधवरावांनी साईचरणांस वंदन केले. त्यावेळी बाबा त्यांना म्हणाले, “धीर सोडू नकोस. मनाने हैराण होऊ नकोस. तू बरा होशील. काळजी करू नकोस. दयाळू फकीर सारे काही सांभाळेल. तू निश्चिंत मनाने घरी जा. मात्र घराबाहेर पडू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव.’’ माधवराव निश्चिंतपणे घराकडे निघाले.

माधवराव घरी पोहोचण्याच्या आत बाबांनी माधवरावांची चौकशी करण्यास तात्यांना धाडले व निरोप दिला, ‘शाम्याला म्हणावे निजू नये. घरातल्या घरात फिरत राहावे. वाटेल ते खुशाल खावे. माझे एवढे सांगणे काळजीपूर्वक न चुकता सांभाळावे.’ त्यानंतर लगेच बाबांनी काकासाहेब दीक्षितांनाही माधवरावांकडे धाडले व निरोप पाठवला, “शाम्याला झोपण्याची लहर येईल, पण निजू देऊ नका.’’ बाबांच्या सांगण्यानुसार सावधानता बाळगल्याने माधवराव सर्पदंशातून खडखडीत बरे झाले.

या प्रसंगामध्ये बाबांचे रागारागाने बोलणे माधवरावांसाठी नसून सर्पदंशामुळे चढणाऱ्या विषासाठी होते. “चल निघ जा, खाली उतर’’ या साईमंत्राने माधवरावांच्या शरीरात पसरणारे विष तात्काळ खाली उतरले. असा हा साईमहिमा आणि मशीदमाऊलीचे आख्यान आहे.

आपली प्रतिक्रिया द्या