।।श्री साई गाथा ।। भाग २ रा

>> विवेक दिगंबर वैद्य

श्रीआनंदनाथ हे खरं तर अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे अंतरंगातील शिष्य होते. श्रीस्वामीसमर्थांच्या सूचनेनुसार श्रीआनंदनाथ सावरगाव येथे आले. शिर्डीजवळच्या सावरगाव येथील वास्तव्यादरम्यान श्रीआनंदनाथांमधील अवतारीत्वाची प्रचीती तेथील ग्रामस्थांना आली. श्रीआनंदनाथांच्या हातून घडलेल्या दैवी लीलांचे माहात्म्य अपरंपार होते. ते पंचक्रोशीमध्ये इतके ख्यातकीर्त झाले की त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीकर भाविक मंडळीही येत असत. जेव्हा श्रीआनंदनाथांनी शिर्डीस येण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा शिर्डीकर मंडळी हरखली. श्रीआनंदनाथांसारख्या सत्पुरुषांचे चरण आपल्या शिर्डी गावांस लाभणार या वार्तेने सर्वत्र आनंदीआनंद झाला.

।। श्री साई समर्थ ।। भाग १ ला

श्रीआनंदनाथांनी शिर्डी येथे येताचक्षणी सर्वप्रथम त्या तरुण साधूची भेट घेतली. त्यास आलिंगन दिले. हा प्रसंग श्रीसाईसच्चरित्रामध्ये कै. गो. र. दाभोळकर यांनी पुढीलप्रमाणे वर्णिलेला आहे. ‘तैसेच एक आणिक संत। आनंदनाथ नामे विख्यात। त्यांचेही हेच भाकीत। कर्तृत्व अद्भुत करितील हे।। महाप्रसिद्ध आनंदनाथ। येवले ग्रामी मठ स्थापित। काही शिर्डीकरांसमवेत। आले ते शिर्डीत एकदा।। अक्कलकोटकर महापुरुष। आनंदनाथ तयांचे शिष्य। म्हणाले पाहून साईस समक्ष। ‘हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा’।। आज जरी हा उकिरड्यावर। तरी हा हिरा, नाही गार। आनंदनाथांचे हे उद्गार। बाबांचे पोरवय होते ते।। ध्यानात ठेवा माझे हे बोल। पुढे तुम्हांस आठव येईल। भविष्य कथून हे पुढील। मग ते येवल्यास परतले।।’
(अध्याय ५ ः ओवी क्रमांक  ४० ते ४४)

swami_sai-gatha-2

शिर्डीमधील त्या पोरसवद्या साधूचे कौतुक श्रीआनंदनाथांनी करावे या घटनेने शिर्डीवासीय अचंबित झाले. मागील काही काळ येथे वास्तव्यास असलेल्या त्या साधुवृत्तीच्या तरुणास, पंचक्रोशीत ख्याती पावलेल्या श्रीआनंदनाथांनी अपार महत्त्व द्यावे ही बाब शिर्डीकरांसाठी आश्चर्यजनक होती. मात्र ज्याअर्थी श्रीआनंदनाथांनी ‘हा सत्पुरुष प्रत्यक्ष ‘हिरा’ आहे, यास गारगोटीसमान मानू नका’ असे निखालस सत्यवचन उच्चारले की, त्याअर्थी त्यांनी आपल्या झापडबंद डोळ्यांमध्ये घातलेले हे झणझणीत अंजन आहे याची नोंद चाणाक्ष शिर्डीकरांनी घेतली आणि येथूनच पुढे, शिर्डीमधील येणारा काळ त्या सत्पुरुषासाठी तुलनेने कमी त्रासदायक ठरला.

श्रीआनंदनाथांचे सावरगावी येण्याचे कारण हे आणि एवढेच. शिर्डीत दाखल झालेल्या त्या साधुपुरुषास तेथेच सन्मानाने स्थिर करावयाची जबाबदारी ‘अक्कलकोटकर महापुरुष’ म्हणजे श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी श्रीआनंदनाथांवर सोपवली होती. ही जबाबदारी पार पडल्यावर लागलीच श्रीस्वामी महाराजांनी श्रीआनंदनाथांस माघारी परतण्याची सूचना केली. असो.

श्रीआनंदनाथांनी ज्यांस ‘प्रत्यक्ष हिरा’ म्हणून संबोधले तो सत्पुरुष पुढे ‘शिर्डीचे साईबाबा’ या नावाने जगविख्यात झाला. आज सर्व जग ज्यांच्यासमोर आदराने नतमस्तक होते त्या साईबाबांचे शिर्डी येथे स्थिर होण्यामागचे कारण वरील प्रसंगानुसार होते.

श्रीसाईबाबांचे गुरु वेंकुसा होते असे म्हटले जाते तसेच त्यांचे गुरु ‘अक्कलकोटकर महापुरुष श्रीस्वामी समर्थ होते’ असेही सांगितले जाते. एकदा, भाई नावाच्या मुंबईकर भक्ताला, ‘आपण अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे व मनोभावाने पूजा-उपचार समर्पावे’ असे वाटले. त्याने मुंबईहून निघण्याची तयारी केली. मात्र त्याचा बेत तसाच राहून गेला आणि त्याने शिरडीची वाट धरली. कारण उद्या तेथे जाणार, तो आज स्वप्नात स्वामी समर्थांची त्यास आज्ञा झाली की, ‘सध्या माझा निवास शिर्डीत आहे, तर तू तेथे जा.’ त्या आज्ञेस शिरसावंद्य मानून भाई शिर्डीस गेले व तेथे सहा महिने राहून आनंदसंपन्न झाले. भाई श्रीस्वामींस अतिशय निष्ठावंत होते. श्रीस्वामींच्या त्या दृष्टांताची आठवण रहावी म्हणून सन १९१२ मध्ये भाईंनी भजन-पूजनासह निंबवृक्षाखाली श्रीस्वामींच्या पादुका स्थापिल्या. हा उल्लेख श्रीसाईसच्चरित्राच्या पाचव्या अध्यायामध्ये आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या