।। श्री साईगाथा ।। भाग २० वा – साईंची ‘हंडी’

  • विवेक दिगंबर वैद्य

शास्त्रकारांनी प्रत्येक युगामध्ये संसारीजन, साधक, जिज्ञासू अशा सर्वांनाच मोक्षप्राप्तीचा लाभ व्हावा या कारणाने काही युक्त्या सुचविलेल्या आहेत. उदाहरणार्थ सत्ययुगामध्ये तपश्चर्या करणे, त्रेतायुगामध्ये ज्ञान संपादन करणे आणि द्वापारयुगात यज्ञ करणे यांमुळे मोक्षप्राप्ती करता येईल असे सांगणाऱ्या शास्त्रकारांनी कलियुगासाठी मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून ‘दानधर्म’ करण्याचे सांगितले आहे. तसेच हा दानधर्म मुख्यत्वे अन्नदानाच्या स्वरूपात करावा असेही स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले आहे. अन्नदानासारखे मोठे पुण्य नाही. अन्नदान हे श्रेष्ठदान आहे असे शास्त्रकार सांगतात. बाबांच्या अवतारकार्यामध्येही बाबांनी अन्नदानास अपार महत्त्व दिले आहे.

शिर्डी व पंचक्रोशीमध्ये साईबाबा अवतारी सत्पुरुष म्हणून जसे प्रसिद्ध होते तसेच त्यांच्या अन्नदानाच्या कार्यामुळेही विशेष लोकप्रिय होते. मशिदीच्या अंगणात एक मोठी चूल रचून साईनाथ त्यावर मोठ्या तोंडाचे पातेले चढवीत असत. त्या पातेल्यामध्ये ते कधी ‘मिठ्ठे चावल’ तर कधी मांसमिश्रित पुलाव करीत, कधी गव्हाच्या पिठापासून मुटकुळ्या तयार करून डाळीच्या वरणात शिजवत, तर कधी त्या पिठाचे रोडगे (निखाऱ्यावर भाजलेले पिठाचे जाडसर गोळे) किंवा पानगे (पानाला पीठ लावून त्याची वळकटी निखाऱ्यावर भाकऱ्यांसारखी भाजणे) थापून मुटकुळ्यांसोबत वरणात सोडीत असत. दगडी पाट्यावर मसाला वाटून बाबा स्वयंपाकाची सिद्धता स्वतःच करीत आणि मुगाच्या पिठाच्या वड्या स्वतः बनवून हंडीत सोडीत असत.

20-sai-handi

बाबांकडे दोन प्रकारच्या हंड्या होत्या. त्यातील लहान हंडीमध्ये पन्नास जणांना पुरेल एवढे अन्न शिजवले जात असे आणि मोठ्या हंडीमध्ये तयार केलेले अन्न शंभर माणसे जेवूनही शिल्लक राहत असे. बाबा त्यांच्या स्वयंपाकासाठी कधी मोठ्या तर कधी लहान हंडीचा वापर करून अनेक क्षुधार्थींना तृप्त करीत असत. चुलीतील जाळ कमीअधिक करण्यासाठी लाकडे सतत खाली-वर करण्याचे कामही बाबा स्वतःच करीत असत. स्वयंपाकाची सिद्धता करण्याची पूर्ण जबाबदारीही बाबांकडेच असे आणि त्यासाठी वाण्याच्या दुकानाकडे ते स्वतः जात असत. त्यांनी कधीही उधारी केली नाही. घेतलेल्या सामानाचे रोकडे पैसे ते देत असत. स्वयंपाकाच्या दृष्टीने आवश्यक असणारे मीठ, मिरची, मसाला, भाजीपाला, नारळ, खोबरे आदी जिन्नस बाबा स्वतः घेऊन येत. तसेच मशिदीत स्वतः जाते मांडून गहू, डाळ व जोंधळा दळीत असत.

हंडीतील भोजन उत्तम व्हावे याकरिता मसाला वाटण्याचे कामही बाबा स्वतःच करीत. डाळ भिजत घालून बाबा पाट्यावर वाटण करीत व त्यात हिंग, जिरे, कोथिंबीर मिसळून झणझणीत चविष्ट स्वयंपाक करीत असत. कणकेचे गोळे तिंबून त्याचे सवा हात लांबीचे वेटोळे करून व लाटून त्याच्या लांब-रुंद आणि मोठ्या आकाराच्या पोळ्या करीत आणि त्यासोबत, जोंधळ्याच्या पिठात पाणी घालून व त्यात ताक मिसळून आंबीलही तयार करून इतर अन्नाबरोबर बाबा स्वहस्ते मोठ्या प्रेमाने सर्वांना वाढीत असत.

बाबा कधीकधी मांसमिश्रीत पुलावदेखील करीत आणि त्यासाठी गावच्या मशिदीतील मौलवीला बोलावून त्याच्याकडून कुराणातील फातिया म्हणवून शेळीची विधिपूर्वक हत्या करवीत. हंडीतील पदार्थ चांगले शिजल्याची खात्री केल्यावर, बाबा चुलीवरून हंडी उतरवून मशिदीत नेत आणि त्या मांसमिश्रित अन्नाला मौलवीकरवी विधिपूर्वक फातिया (फातिहा, मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून म्हटला जाणारा कुराणातील मंत्र) देववित. म्हाळसापती व तात्या कोते यांना प्रथम प्रसाद पाठवून त्यानंतर बाकीचे अन्न स्वहस्ते दीनदुबळ्यांना देऊन व तृप्त करवून बाबा सुख-समाधान पावत. अन्नार्थी मंडळी पोटभर खात असत, तरीही बाबा त्यांना ‘घ्या, घ्या’ असा प्रेमाने आग्रह करीत.
साईंनी स्वतः बनविलेल्या व वाढलेल्या भोजनाचा स्वाद घेण्याची संधी ज्यांना लाभली त्यांच्या भाग्याचे वर्णन ते काय करावे!!!

आपली प्रतिक्रिया द्या