।। श्री साईगाथा ।। भाग २१ वा – साईंचे अन्नदान

विवेक दिगंबर वैद्य

श्रीसाईनाथांच्या अन्नदानाचे, विशेषतः मांसमिश्रित पुलावाचे कुतूहल सर्वांनाच होते आणि आजदेखील आहे. साईंसारखा सत्पुरुष ‘प्राणीहत्ये’चे समर्थन करतो का? असा प्रश्न अनेकांना पडत असे. मात्र याविषयीचे स्पष्टीकरण देताना कै. गो. र. दाभोलकर श्रीसाईसच्चरित्राच्या अडतिसाव्या अध्यायात सांगतात, ‘स्वर्गादी सुखप्राप्तीसाठी पूर्वकाळी मंडळी यज्ञ करीत असत व ‘यज्ञबळी’रूपाने पशुबळी देत असत. यज्ञामध्ये पशूमांसाचा हिस्सा ‘आहुती’च्या रूपाने अग्नीस विधिपूर्वक अर्पण करण्यात येत असे व त्यास ‘प्रसाद’रूपाने विप्रवर्गदेखील सेवन करीत असे. ही पशुहिंसा ‘शास्त्रमान्य’ असे. त्यानुसार बाबासुद्धा मांसयुक्त पदार्थ बनविताना गावातील मुल्ला, मौलवींकडून विधिवत व संस्कारपूर्वक पशुहत्या करवून घेत असत. तयार केलेले हे अन्न बाबा स्वहस्ते उपस्थितांना देत असत, मात्र त्यांनी कधीही शाकाहारी भक्तमंडळींना मांसाहारी अन्न दिले नाही. ज्यास नेहमीच मांस खाण्याची सवय आहे अशांनाच हे अन्न दिले जात असे.

21-sai-annadan

जो सत्पुरुष पाच घरी भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह साधत असे त्याने स्वतः स्वयंपाकाचा घाट घालून अन्य मंडळींना जेवू घालण्याचा खटाटोप करावा हे अनेकांसाठी कुतूहल होते. खरे पाहिल्यास, बाबांना आवश्यक तेवढी भिक्षा दररोज मिळत होती. बाबांच्या अवतारित्वाची प्रचीती एव्हाना अनेकांना आली असल्याने त्यातील कुणा एकाने दररोज नैवेद्य आणला असता तरीही बाबांना मशिदीत बसल्याबसल्या नित्यनेमाने भोजन प्राप्त झाले असते. मात्र तरीही बाबा एखाद्या प्रापंचिकासारखा स्वतः स्वयंपाक करीत असत.

बाबांची ‘हंडी’ हा त्यांच्या अवतारकार्यातील एक वेगळाच आणि औत्सुक्यपूर्ण ठरावा असा ‘अध्याय’ आहे. या हंडीच्या विषयाने बाबांमधील व्यवहारी स्वभावाच्या, वात्सल्याच्या आणि संसारी असण्याच्या सर्व छटा आढळून येतात. बाबा खरेदीसाठी स्वतः सूप घेऊन जात, त्यामध्ये योग्य ते धान्य निवडून व पाखडून घेत. डाळ-तांदूळ वा पीठ उत्तम प्रतीचे असल्याची खात्री करवून त्याचा योग्य तो दर ठरवीत असत. प्रसंगी बरीच घासाघीस घालून योग्य त्या किमतीत वाणसामान मिळेपर्यंत थांबून राहात. योग्य भाव मिळाला की हिशेब तत्काळ चुकता करीत असत. बाबांनी कुणाकडे कसलीही उधारी ठेवली नाही, उलट स्वारी खूश असल्यास ते वाण्याला दोन-चार रुपये ‘बक्षीस’ म्हणून देत असत. बाबांना स्वतःची कामे स्वतः करण्याची हौस होती. त्याकरिता इतरांना कामाला लावणे, अन्य कुणाचे साहाय्य घेणे त्यांना बिलकूल मंजूर नव्हते. हंडीतला स्वयंपाक करण्यासाठी जळाऊ लाकूड शोधून आणणे, धुनीलगतच्या भिंतीजवळ लाकडांची चळत व्यवस्थितरीत्या रचून ठेवणे ही कामे बाबाच करीत असत. जळाऊ लाकडाच्या वखारीला आधार देणारी आडोशाची भिंत बाबांनी स्वतःच उभी केली होती. महादू फसले या भक्ताने चिखलाचा राडा तयार केला की बाबा विटांचा थर रचून त्यावर चिखल थापत असत. गवंड्यालाही लाजवेल अशा रीतीने बाबांनी ही भिंत उभारली होती. (मशिदीची झाडलोट करणे, जमीन सारवणे, पाणी भरून ठेवणे, लाकडे रचणे, दळणे, धान्य निवडणे तसेच स्वतःची कफनी व लंगोट स्वतःच शिवणे अशी कामे बाबा विलक्षण तन्मयतेने आणि निगुतीने करीत असत.) बाबांच्या स्वयंपाकाची पद्धतही निराळीच होती. हंडीतील पदार्थ रटरटून शिजू लागला की बाबा कफनीच्या बाह्या मागे सारून हंडीत हात घालीत आणि सहजगत्या पदार्थ ढवळीत. त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही भय वा त्रास जाणवत नसे. त्यांच्या हातावर कधी भाजल्याची खूणदेखील उमटली नाही. ज्यांच्या हस्तस्पर्शाने सर्व प्रकारचे ताप दूर होतात त्यांस अग्नीचा ताप काय बाधणार?

बाबांची ‘हंडी’ आणि ‘अन्नदान’ बराच काळपर्यंत कुतूहल व अपूर्वाईचा भाग होता, मात्र पुढे बाबांचे माहात्म्य चोहीकडे पसरू लागले, दासगणूंसारखे भक्त साईगाथेचे गुणगान सर्वत्र करू लागले तशी शिर्डी भक्तांच्या गर्दीने गजबजून गेली. भक्तांनी नैवेद्याच्या रूपात आणलेले पदार्थ इतके मुबलक असत की पुढे ‘हंडी’ बनविण्याची गरज साईंनाथांना कधी भासलीच नाही.

आपली प्रतिक्रिया द्या