।। श्री साईगाथा ।। भाग २२ वा – बाबांची ‘उदी’

  • विवेक दिगंबर वैद्य

बाबांचे सांसारिक गृहस्थांसारखे वागणे अनेकदा भक्तांच्या मनात संदेह निर्माण करीत असे, मात्र अशा भक्तांचे प्रमाण नगण्य म्हणावे इतके होते. याचे कारण बाबांपाशी येणारे बहुतेक भक्त प्रापंचिक होते, संसारदुःखाने गांजलेले होते. परमार्थाचा फारसा वारा न लागलेले व प्रपंचात आकंठ बुडालेले हे भक्त जेव्हा साईबाबांकडे येत असत आणि त्यांचे सांसारिक गृहस्थांसारखे वागणे पाहत असत तेव्हा त्यांना हा ‘संत’ आपल्यातलाच आहे असा विश्वास वाटत असे. साईबाबांवर सर्वांचा पूर्ण भरवसा होता. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे साईनाथांची ‘गृहस्थी’ दिनचर्या. साईंचा गोष्टीवेल्हाळ स्वभाव, त्यांचे वागणे-बोलणे, त्यांचा स्वयंपाक, त्यांच्या तोंडून निघणारे व्यावहारिक बोलणे यामुळे साई प्रापंचिक व गृहस्थाश्रमी संत वाटत असत. परिणामतः संसारीजनांना ते आपलेसे वाटत असत.

sai-1

जवळपास येणाऱ्या प्रत्येकाकडे बाबा दक्षिणा मागत असत. कधी दक्षिणा म्हणून काही ना काही समोर ठेवण्यास सांगत तर कधी मात्र दक्षिणारूपाने नेमके किती पैसे ठेवावे हेदेखील स्पष्टपणे सांगत असत. या पैशातून बाबा दीनदुबळ्यांसाठी काही रक्कम देत असत किंवा फळ-फळावळे, धान्य वा गरजेच्या वस्तू विकत घेत तर कधी जळाऊ लाकडांचे भारे विकत घेत असत. जळणाकरिता वापरण्याची ही लाकडे ते एका भिंतीशी रचून ठेवत व त्यातील वाळक्या काड्या आपल्यासमोरील धुनीमध्ये जाळत असत. यातून निर्माण होणारी राख साईबाबा त्यांच्या दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना ‘उदी’ प्रसादाच्या रूपाने देत असत.

बाबांच्या दर्शनार्थ आलेला भक्त माघारी परतताना बाबांची अनुमती घेण्यासाठी जात असे तेव्हा बाबा सेवाधाऱ्यास ‘उदी आणा’ असे सांगत असत. ‘उदी आणा’ म्हटले म्हणजे आपल्याला परतण्याची ‘सूचना’ झाली अशी खूणगाठ मनाशी बांधून भक्तगण माघारी परतत असत. ज्या भक्तांचा शिर्डीत मुक्काम असे त्यांनादेखील सकाळ, दुपार व सायंकाळी बाबांचा ‘उदी’रूपी कृपाप्रसाद प्राप्त होत असे.

बाबांची ‘उदी’ हा नेमका काय प्रकार होता? उदीचा ‘गुण’ काय होता? तिन्हीत्रिकाळ येणाऱ्या भक्तांना बाबा न चुकता ‘उदी’ देत असत यामागचं प्रयोजन काय असावं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल, तर त्यामागचं कारण साईसच्चरित्रात नमूद केलेलं आहे. ‘उदी’ म्हणजे ‘राख’. या जगामध्ये आपल्या नजरेस दिसणारे सारे काही राखेसमान आहे. मनुष्यदेहदेखील पंचमहाभूतांचे भोग भोगणारा काष्ठतुकडा, एके दिवशी संकेतानुसार हालचाल थांबवतो व लाकडासारखा कडक होऊन पडतो, मग त्यांस जाळले असता शिल्लक राहते ती निव्वळ राख. बाबा जणू हेच सुचवितात की, ‘या जगात आयुष्य जगण्यासाठी आलेल्या तुम्हा सर्वांची व माझीदेखील हीच स्थिती होणार आहे. याची आठवण तुम्हांला नित्यनेमाने, रात्रंदिवस आणि मरेपर्यंत होत राहावी म्हणून मी तुम्हांला ही ‘उदी’ देतो.’ हे जग म्हणजे निव्वळ मायेचा देखावा. ब्रह्म हेच सत्य आणि ब्रह्मांड हीच माया, याचेच प्रतीक म्हणजे ‘उदी’. जग नाशिवंत आहे हे सुचवणारी उदी.

देहाची ‘राख’ मातीत मिसळली की कोणत्याही नात्याला अर्थ राहात नाही. मात्र या राखेतून निर्मिलेली ही बाबांची उदी शरीराला चोळली की मनाची व शरीराची दुःखे नाहीशी होतात. ‘विवेक आणि वैराग्य यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी मी दक्षिणा घेतो आणि उदी देतो’ असे बाबा सांगत अन् इतकंच नव्हे तर अनेकदा खुशीत येऊन ते गाणे म्हणत, त्यातही एका भजनामधील ‘रमते राम आयोजी। उदियां की गोनियां लायोजी।।’ हे पद वारंवार आणि तल्लीन होऊन म्हणत असत. बाबांच्या शिर्डीतील कल्याणकारी धुनीने उदीच्या किती गोण्या उत्पन्न केल्या हे साईच जाणे. मशिदीत धुनी अखंड पेटलेली असे. दर्शनार्थ येणाऱ्या लहान-मोठ्या सर्वच भक्तांना बाबा प्रसादरूपाने उदी देत तर काही भाग्यवंतांच्या कपाळास स्वहस्ते उदी फासत असत आणि मस्तकावर हात ठेवत असत.
‘हा संसार उदीसारखा आहे. एक दिवस असा येईल की आपली या उदीसारखी राख होईल’ हाच या उदीमागचा खरा अर्थ आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या