।। श्री साईगाथा ।। भाग २३ वा – उदीचे चमत्कार

विवेक दिगंबर वैद्य

बाबांच्या साक्षात्कारी ‘उदी’चा बोलबाला पाहता पाहता वाढू लागला आणि अनेक भक्तांच्या चिंता, समस्या पाहता पाहता नाहीशा झाल्या. बाबांच्या या उदीच्या प्रभावाने आणि प्रचीतीने पुढे बाबांचे अनेक निस्सीम भक्त स्वतःच या उदीचा प्रचार व प्रसार करू लागले.

नाशिक येथे नारायणराव जानी नावाचे एक स्वयंपाकी ब्राह्मण होते. बाबांचेच परमभक्त रामचंद्र मोडक यांच्यापाशी ते नोकरीस होते. एके दिवशी नारायणराव त्यांच्या मातोश्रींसह बाबांच्या दर्शनास आले तेव्हा एकाएकी बाबा त्यांना म्हणाले, ‘यापुढे आपला नोकरीशी संबंध राहणार नाही. ही ताबेदारी आता पुरे. यापेक्षा स्वतंत्र धंदा बरा.’ थोड्याच दिवसात नारायणरावांची नोकरी सुटली आणि त्यांनी स्वकर्तृत्वावर ‘आनंदाश्रम’ या नावाचे भोजनालय आणि वसतिगृहाची उभारणी केली. काही दिवसांतच साईकृपेने त्यांचे यथोचित बस्तान बसले.

23-saibaba

एके दिवशी नारायणरावांच्या एका मित्राला विंचू चावला आणि त्याला फार वेदना होऊ लागल्या. दंशस्थानी बाबांची उदी लावावी असे त्यास वाटल्याने त्याने नारायणरावांकडे उदी मागितली, मात्र दुर्दैवाने जवळ उदी नसल्याने नारायणरावांनी बाबांच्या तसबिरीसमोर उभे राहून त्यांची करुणा भाकली व तसबिरीपुढे पडलेली उदबत्तीची राख उचलून तीच ‘उदी’ आहे या भावनेने साईचरणांना लावली व मुखाने साईनामाचा जप करीत चिमूटभर मित्राच्या तोंडामध्ये घालून त्यास जिथे विंचुदंश झाला होता त्या ठिकाणीही लावली. साईनामाचा जप करीत लावलेल्या त्या उदबत्तीच्या राखेमुळे वेदना तत्काळ दूर होऊन नारायणरावांचे स्नेही खडखडीत बरे झाले.

असाच प्रसंग नानासाहेब चांदोरकरांच्या बाबतीतही घडला. एका साईभक्ताच्या मुलीला ग्रंथीज्वर झाल्याची बातमी समजली, मात्र त्याच्याकडे ‘उदी’ नसल्याने त्याने नानासाहेबांकडे एका गृहस्थाला पाठवले. मात्र नानासाहेब त्याच वेळी कुटुंबासह कल्याणला जाण्यास निघाले होते. या माणसाची व त्यांची गाठ ठाणे स्टेशनात पडली. त्याच्याकडचा निरोप मिळताच नानासाहेबांनी भक्तिभावाने रस्त्यातील माती उचलली आणि साईंचे स्मरण करून आपल्या पत्नीच्या मस्तकी लावली. त्याचवेळी इथे तापाने फणफणलेल्या त्या मुलीच्या प्रकृतीस आराम पडला आणि काही दिवसांतच ती ठणठणीत बरी झाली. बाबांच्या उदीच्या सामर्थ्याचा हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुरावा आहे.

एकदा, खुद्द नानासाहेब चांदोरकर यांच्या मुलीस बाळंतपणाच्या वेदना होऊ लागल्या. तिला वेदना सहन होईनात म्हणून नानासाहेबांनी साईनाथांचा धावा केला आणि मुलीला संकटमुक्त करावे अशी प्रार्थना ते जामनेर येथून करू लागले. शिर्डीमध्ये बाबांना ही गोष्ट कळली. बाबांच्या मनात नानासाहेबांना उदी पाठविण्याचा विचार आला, नेमकेपणाने त्याच वेळी रामगीरबुवांच्या मनातही त्यांच्या गावी, खानदेशात जाण्याचा विचार आला. जाण्यापूर्वी बाबांची संमती घ्यावी म्हणून रामगीरबुवा मशिदीत आले तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘बापूगीर, तू खुशाल जा, पण वाटेत थोडी विश्रांती घे. आधी जामनेरला नानासाहेब चांदोरकराच्या घरी जा, त्याची खुशाली विचार व मगच पुढचा रस्ता धर.’ त्यानंतर बाबांनी माधवराव देशपांडेंकडून माधवराव आडकरांनी रचलेली आरती कागदावर लिहून मागितली आणि आरतीचा कागद व उदी एका पुडीत बांधून रामगीरला देत म्हणाले, ‘बापू, ही उदी व आरती नानाला दे आणि त्याची ख्यालीखुशाली विचारून पुढे गावांस जा.’

त्यावेळी रामगीरबापूंकडे फक्त दोन रुपये होते. त्या पैशात जामनेरला कसे जावे या विचारात असताना बाबा म्हणाले, ‘तू स्वस्थ जा. तुझी सर्व व्यवस्था होईल.’ बाबांनी आश्वस्त केल्यामुळे रामगीर लगेच निघाले, मात्र जळगावपर्यंत ट्रेनने जाईपावेतो एक रुपया चौदा आणे खर्च होऊन दोन आणे शिल्लक राहिल्याने, जामनेरपर्यंतचे चाळीसेक कि.मी. अंतर कसे गाठावे या विचारात ते असताना त्यांना एक शिपाई ‘शिर्डीचे बापूगीर कोण आहे?’ अशी चौकशी करताना दिसला. त्यावर बापूगीरबुवांनी त्यास स्वतःची ओळख देताच तो शिपाई म्हणाला, ‘नानासाहेबांनी तुम्हाला आणण्यासाठी टांगा पाठवलाय. लवकर चला. ते तुमची वाट पहात आहेत.’

आपली प्रतिक्रिया द्या