।। श्री साईनाथ ।। भाग २५ वा – दोन पैशांची गोष्ट

  • विवेक दिगंबर वैद्य

साईबाबांच्या अवतारकार्यातील अनेकविध घटनांकडे पाहिले असता जाणवते की, बाबा केवळ मशिदीत बसूनच त्यांच्या सर्वदूर पसरलेल्या भक्तांचा योगक्षेम चालवीत होते. कोण कुठचा, ना ओळखीचा ना परिचयाचा, व्यथा-मनस्ताप आणि संसारदुःखाने गांजलेला गृहस्थ, कुणीतरी सुचविले-सांगितले म्हणून शिर्डीस येत असे आणि बाबांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून समस्यामुक्त होत असे. ज्यांनी कधी साईबाबांचे नाव ऐकले नव्हते, ज्यांना साईबाबांविषयी कसलीही माहिती नव्हती, ज्यांनी साईबाबांना कधी पाहिले देखील नाही अशी माणसे कुणा एखाद्या साईभक्ताच्या शिफारशीवरून वा त्यांना आलेल्या साईंच्या प्रचीतीस ग्राह्य धरून शिर्डीस येत आणि धन्य होऊन परतत.

साईंच्या अवतारकार्याची ही फार मोठी खुबी आहे. साईबाबा स्वतःसुद्धा शिर्डीमध्ये अवचितपणे अवतरले. तेथे ना कुणी त्यांच्या नात्याचे होते ना परिचयाचे. बाबा शिर्डीस आले आणि कायमचे स्थिरावले. त्यांच्या चैतन्यमयी अस्तित्वामुळे शिर्डी नामक खेडेगावाचा कायापालट झाला. पंचक्रोशीतही फारसे महत्त्व न राखणारी ही भूमी साईस्पर्शाने ‘पुण्य’भूमी बनली. बाबांचे आगमन झाल्यानंतर काही वर्षांतच अनेक हौशे-नवशे-गवशे, ज्ञानार्थी, आर्त, जिज्ञासू, मुमूक्षू आणि साधकमंडळीदेखील शिर्डीच्या दिशेने धावू लागली. बाबांचे येथे वास्तव्य झाले आणि काही काळातच गावातील बहुतेकांना साईंचा लळा लागला. ज्याला जसजशी प्रचीती येत गेली तसतसा तो साईचरणी लीन झाला. साईंच्या सान्निध्यात राहू लागला. बाबादेखील त्यांच्यापाशी येणाऱ्या भक्ताला कधी काही विचारत नसत. त्यांच्यावर विसंबून आलेल्या भक्तावर आपली प्रेमळ कृपादृष्टी ठेवून त्यास आश्वस्त करीत असत आणि त्याला निश्चिंतपणाने मार्गस्थ करीत असत.

25-saibaba-1

बाबांनी रीतसर कुणावर अनुग्रह केला नाही वा गुरुमंत्र दिला नाही हे जरी खरे असले तरीही त्यांची निस्सीम भक्ती करणारा त्यांचा भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी बाबा त्याला स्वतःपाशी खेचून आणत असत. ‘तुम्ही कुठेही असा, माझे तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे. चिमणीच्या पिल्लाच्या पायाला दोरा बांधून त्याला ओढावे तसे मीही माझ्या भक्तांना, ते कुठेही असले तरी ओढत माझ्यापाशी घेऊन येतो.’ एका प्रसंगात तर बाबांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘मी देहात नसलो तरी घाबरू नका. मी तुमच्या नित्य स्मरणात आहे. माझी हाडे माझ्या समाधीमधूनही तुमच्याशी बोलतील.’ बाबा अष्टौप्रहर भक्तांच्या हितामध्येच गुंतून राहत. याच संदर्भातील ही एक कथा.

खाशाबा देशमुखांची आई राधाबाई साईदर्शनाच्या ओढीने शिर्डीत आली. दर्शन घेतल्यानंतर तिचे बाबांविषयीचे प्रेम अन् श्रद्धा ओसंडून वाहू लागली. साईंना तिने मनोमनी गुरू मानले आणि त्यांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा, परमार्थाचा मार्ग प्रशस्त करून आपल्याला अनुग्रह वा उपदेश द्यावा असा आग्रह धरला. राधाबाई अतिशय वृद्ध होत्या. बाबांवर प्रचंड निष्ठा व श्रद्धा राखून होत्या. जोपर्यंत बाबा अनुग्रह देत नाहीत तोपर्यंत शिर्डी सोडून जायचे नाही असा निश्चय करून सोबत, अन्न-पाण्याचाही त्याग करून साईकृपा व्हावी असा हट्ट धरत्या झाल्या. अशातच तीन दिवस उलटले. अवतीभवतीच्या सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण बाई बधल्या नाहीत.

साईंचा उपदेश मिळाल्याशिवाय गावी परतायचे नाही हा हट्ट राधाबाईंनी काही केल्या सोडला नाही म्हणून अखेर माधवराव देशपांडे यांनी हा वृत्तांत बाबांच्या कानावर घातला. बाबा कळवळले. त्यांनी लागलीच राधाबाईंना बोलावून घेतले व त्यांना म्हणाले, “आई! तू का गं असे केलेस? का गं जिवाचे हाल केलेस? तुला मरण आठवले का? अगं मी फकीर आहे! मी तुझा लेक. तू माझी आई. अगे, माझा गुरू मोठा अवलिया होता. मी त्याची सेवा करून दमलो पण त्याने मला कधी कानमंत्र दिला नाही. मी खूपदा प्रयत्न केला पण तो बधला नाही. अखेरीस त्याने माझ्याकडे दोन पैसे मागितले. माई, तुला वाटेल की एवढा मोक्षगुरू मग व्यवहारी असल्यागत पैसे का बरं मागतो? तर तसे नाही. मी त्याला लगेच दोन पैसे दिले. श्रद्धा आणि सबुरी हे दोन पैसे दिल्यावर माझी गुरुमाऊली माझ्यावर प्रसन्न झाली.’’

आपली प्रतिक्रिया द्या