श्रीसाईबाबा होते तरी कोण?

।।श्री साई गाथा ।।  भाग ३ रा

>> विवेक दिगंबर वैद्य

श्रीक्षेत्र शिर्डीमधील साईबाबांचे ‘गुरुस्थान’ म्हणून ओळखला जाणारा परिसर काही संशोधकांच्या मते अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थ यांचे गुरुतत्त्व दर्शविणारा आहे. श्रीस्वामी समर्थ महाराज हेच साईबाबांचे गुरु असून देहावताराची समाप्ती झाल्यानंतर त्यांनी दृष्टांताद्वारे अक्कलकोटास येणाऱ्या त्यांच्या काही भक्तांना शिर्डीस साईबाबांचे दर्शन घेण्यास सांगितल्याचे दाखले आहेत. श्रीस्वामीमहाराज देहावतारात असताना त्यांस कुण्या एका भक्ताने कबूल केलेली दक्षिणारूपी रक्कम पूर्णपणे देता आली नाही. पुढे हा भक्त साईंच्या दर्शनास गेला असताना साईंनी त्यास श्रीस्वामीचरणांशी केलेल्या नवसाची आठवण करून दिली व त्याच्याकडून उर्वरित रक्कम मागून घेतली. असो.

श्रीस्वामी आणि साईबाबांचा दृढसंबंध होता याचे दाखले द्यायचेच तर श्रीस्वामींच्या सहवासातील अनेक संत व भक्तमंडळी पुढे साईबाबांना भेटून गेली होती. सन १८७३ मध्ये श्रीस्वामीकृपाप्राप्त साक्षात्कारी संतसत्पुरुष बिडकर महाराज साईबाबांच्या भेटीस गेले होते. शिर्डीकरांना त्यांनी साईबाबांची महती पटवून दिली आणि ‘हे कुणी सामान्य नसून जगद्गुरू आहेत’ असे ठाम विधान केले होते. हा उल्लेख ‘द इम्मॉर्टल फकीर ऑफ शिर्डी’ या ग्रंथामध्ये करण्यात आला आहे.

।। श्री साई समर्थ ।। भाग १ ला

03-bidkar-maharaj-b_sai-ga
बिडकर महाराज

श्री बिडकर महाराज हे जसे श्रीस्वामी समर्थांच्या अंतरंगातील शिष्यप्रभावळीमधील उच्च कोटीचे सत्पुरुष होते, तसेच या प्रभावळीतील अन्य एक सत्पुरुष श्रीगजानन महाराज शेगांवकर यांचेही शिर्डीकर साईबाबांशी बंधुत्वाचे नाते होते. श्रीगजानन महाराज आणि साईबाबा यांच्या भक्तमंडळींमधील धुमाळ वकील, काण्णव कुटुंबीय, बॅ. खापर्डे, काशीनाथ गर्दे, गोपाळ बुटी आदी मंडळी या दोन्ही सत्पुरुषांच्या नित्यसेवेमध्ये होती. दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी श्रीगजानन महाराज समाधिस्थ झाले. तो संपूर्ण दिवस साईबाबा शोकमग्न होते. त्या दिवशी सकाळी त्यांनी न्हाव्यास बोलावून श्मश्रू करून घेतली व ज्यासमयी शेगाव येथे श्रीगजानन महाराजांनी देह ठेवला त्याच समयी शिर्डी येथे साईबाबा जिवाच्या आकांताने कळवळले आणि ‘माझा भाऊ चालला’ असा विलाप करीत त्यांनी जमिनीवर लोळण घेतली व दुःखातिरेकाने गडाबडा लोळू लागले अशी प्रेमळ आठवण बॅ. खापर्डे यांनी ‘श्रीगजानन विजय’ ग्रंथामध्ये केली आहे.

श्रीगंगागीर महाराज, श्रीआनंदनाथ महाराज, श्रीरामानंद बिडकर महाराज, श्रीगजानन महाराज, श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराज, श्रीराममारुती महाराज, अशा अनेक सत्पुरुषांनी साईबाबांची भेट घेतली होती तसेच स्मरण-आठवणीतून त्यांच्याशी संवाद साधला होता.

।।श्री साई गाथा ।। भाग २ रा

एव्हाना श्रीसाईबाबांची महती आणि प्रचीती दिसामासाने वाढत होती. बॅ. खापर्डे, नानासाहेब निमोणकर, दासगणू महाराज, गोपाळ बुटी या दिग्गज निष्ठावंत भक्तमंडळींच्या नित्य येण्या-जाण्यामुळे शिर्डीचे माहात्म्य सर्वदूर पसरू लागले. सन १८७५ ते ८० हा काळ शिर्डी व पंचक्रोशीमध्ये साईबाबांचे महत्त्व व प्रस्थ वाढण्याचा होता. अनेक भक्त साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊ लागले.

अल्पावधीतच शिर्डीनिवासी साईबाबांचा बोलबाला पंचक्रोशीची मर्यादा ओलांडून दशदिशांमध्ये दुमदुमू लागला, तेव्हा साहजिकपणे त्यांच्या पूर्वायुष्याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता शोधकर्त्यांना लागून राहिली. याबाबतीत साईबाबांना विचारावे तर त्यांच्याकडून येणारी माहिती असंबद्ध आणि चक्रावणारी असे. कुणी म्हणे साईबाबा शिर्डीस येण्याआधी श्रीस्वामींच्या आज्ञेने मंगळवेढा परिसरामध्ये राहात होते तर कुणी ते शेलू मानवत येथून आल्याचे सांगत. काहींच्या मते साईबाबा पाथर्डी गावच्या देशस्थ ब्राह्मण कुटुंबातील असून त्यांचे मूळ नाव हरीभाऊ भुसारी होते. श्रीसाईंच्या पूर्वेतिहासाचे संशोधक विश्वास खेर यांनी याविषयावर सखोल संशोधन केले आहे.साईंच्या पूर्वायुष्याविषयी अधिक खोलात न जाता श्रीसाईसच्चरित्र या ग्रंथामध्ये आलेला श्रीसाईंच्या शिर्डी आगमनाविषयीचा वृत्तांत पुढे चालवूया आणि उद्या गुरुवारपासून साईचरित्राचा खऱया अर्थाने वेध घेऊया. ।। जय साईनाथ ।।

 

आपली प्रतिक्रिया द्या