।। श्री साईगाथा ।। भाग ४ था – हे आमचे ‘गुरुस्थान’ आहे!

  • विवेक दिगंबर वैद्य 

श्रीसाईसच्चरित्राच्या चौथ्या अध्यायामध्ये कै. गो. र. दाभोळकर यांनी श्रीसाईबाबांच्या शिर्डीतील पूर्व-वास्तव्याचा संदर्भ देताना सांगितले आहे की, ज्याप्रमाणे भीमारथीच्या प्रवाहात गोणाईला नामदेवांची प्राप्ती झाली आणि ज्याप्रमाणे भागीरथीच्या प्रवाहात शिंपल्याच्या आत दडलेले कबीर महाशयांचे रूप प्रकट झाले त्याचप्रमाणे शिर्डीमधील ग्रामवासीयांना गावकुसाबाहेरच्या निंबवृक्षाखाली तारुण्यावस्थेतील अवघ्या सोळा-सतरा वर्षांच्या कोवळ्या तरुणाचे अर्थात साईनाथांचे दर्शन घडले.

हा सात्त्विक वृत्तीचा, फकिरी वेशातील तरुण कोण, कुठचा, याचे माता-पिता कोण, याचा देश कोणता, प्रांत कुठला याविषयी कसलीही माहिती शिर्डीमधील कुणाही ग्रामस्थास ठाऊक नव्हती. नाना चोपदारांच्या वृद्ध आईला एकेदिवशी अचानकपणे हे गोरेगोमटे सुंदर लाघवी पोर निंबवृक्षाखाली आसनस्थ झालेले दिसले आणि प्रथमदर्शनीच तिचे मन त्या साधू बालकाने आकर्षून घेतले.

ही बालमूर्ती कोण? ही शिर्डी मुक्कामी कशास व कोठून आली? ऊन-वारा-पाणी याची तमा न बाळगता तिथेच का राहती झाली? ज्यास दिवसा कुणाची संगत नाही, कुणाची साथसोबत नाही, रात्री-अपरात्रीचीही ज्यास भीती नाही, असे हे कोवळ्या देहाचे, मोहक रूपाचे आणि नात्यागोत्याचे पाशबंध तोडलेले पोर दिवसाकाठी कसे राहते, काय करते? याचा काहीएक उलगडा शिर्डीवासीयांना होईना.

लौकिक प्रयत्नांमधून या पोराबद्दल काही कळत नाही हे उमगल्यावर ग्रामस्थांनी अन्य हुकमी पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच वेळेस नेमकेपणाने कुणाच्या तरी देहात खंडोबाचा संचार झाला. त्या संचारस्थ दैवताकडे या पोराचा ठावठिकाणा विचारण्यात आला. त्यावर उत्तर मिळाले की, “कुदळी, फावडी आणा आणि मी दाखवेन त्या जागेस खणा. ठावठिकाणा समजेल.’’ लागलीच संचारस्थ दैवताने सुचविलेल्या जागी ग्रामस्थ मंडळी जमा झाली.

04-sai-gurusthan-2

गावकुसाबाहेर असलेल्या निंबवृक्षाच्या पायथ्याशी कुदळीचा घाव घातला गेला. कुदळ भुस्सकन जिथे रुतली, तिथेच भराभरा खोदकाम करण्यात आले. विटांचा चुरा आणि जात्याची तळी चटाचटा बाजूला सारली गेली आणि भुयाराचे मुख सर्वांच्याच दृष्टीस पडले. उत्सुकतेपोटी समग्र गावकऱ्यांनी भुयाराच्या मुखावरील माती दूर सारली तेव्हा आतमध्ये एक पाट, त्याच्या चारही दिशेस जळत्या समया आणि पाटावर गोमुखीसह सुंदरशी जपमाळ ठेवली असल्याचे दृश्य त्यांना दिसले. आश्चर्यचकित झालेले शिर्डीकर संचारस्थ दैवताकडे पाहू लागले तेव्हा त्यांना उत्तर मिळाले की, “या ठिकाणी या पोराने बारा वर्षे तप केले.’’

त्या पोराविषयीचे शिर्डीकरांचे कुतूहल दिवसेंदिवस वाढतच होते. काही जुन्याजाणत्यांनी त्या पोरास निंबवृक्षाच्या स्थानाविषयी विचारले तेव्हा तो साधू बालक त्यांस सांगू लागला की, ‘हे माझ्या गुरूचे स्थान आहे. हे माझे वतन आहे. याचा सांभाळ करा.’ हा प्रकार शिर्डीकरांसाठी खरे तर अनाकलनीय होता, मात्र तरीही त्याच्या विनंतीला मान देऊन शिर्डीवासीयांनी पूर्वीप्रमाणे विटा रचून व भर घालून ते भुयार बंद केले. त्या तरुण साधूला हे स्थान अतिशय ‘प्रिय’ होते. इथला निंबवृक्ष आणि त्याखाली असलेले त्याचे ‘गुरुस्थान’ ही त्या सत्पुरुषाच्या अंतरीची ओढ होती.

तत्कालीन ग्रामस्थ मंडळी या तरुणाविषयी जितका पूज्यभाव ठेवून होती तेवढीच या ‘गुरुस्थाना’विषयी आपुलकी राखून होती. ‘गुरुवारी व शुक्रवारी सूर्य मावळल्यानंतर जो या ठिकाणास शेणाने सारवून त्यावर क्षणभर ऊद जाळेल त्यावर श्रीहरी कृपा करील, त्यास सुखी करेल’ हे त्या पोरवयीन बालकाचे ‘उद्गार’ होते. पुढे ‘साईबाबा’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या ‘सत्पुरुषाचे’ ते दैवी ‘वचन’ होते. आजपावेतो या सत्यवचनाचा ‘प्रत्यय’ प्रत्येक साईभक्तास येत आहे, यापुढेही नित्य निरंतर, अखंड अविरत येणार आहे. जय साईनाथ.

आपली प्रतिक्रिया द्या