।।श्री साईगाथा।। भाग ६ वा – आवो… साई!!

– विवेक दिगंबर वैद्य

घोड्यासारखे उमदे जनावर हरवणे शिवाय, त्याचा थांगपत्ताही न लागणे याची अस्वस्थ करणारी चिंता मनामध्ये वागवीत चांद पाटील माघारी निघाला. परतीच्या मार्गामध्ये त्याला रस्त्यात समोरच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली एक फकीर बसलेला असल्याचे दिसले. त्याच्या जवळूनच पुढे निघालेल्या चांद पाटलाला तो फकीर आपणांस हाक मारत असल्याचे जाणवले.

चांद पाटील ‘धूप’ खेड्याचा ग्रामप्रमुख होता, त्यामुळे अशा अनोळखी भागातील, अनवट पायरस्त्यावर आपल्याला ओळखणारं कुणी भेटेल अशी शंकादेखील मनात येणं जिथे दुरापास्त होतं तिथे हा अनोळखी ‘पुकारा’ ऐकून चांद पाटील मागे वळला. त्याने कुतूहलाने फकिराकडे पाहिले. अंगात कफनी, डोक्यावर टोपी, बगलेत सटका आणि तंबाखू भरलेली चिलीम ओढणारा तो फकीर त्याला म्हणाला, “ये रे! जरा सावलीत बस. माझ्यासोबत चिलीम ओढ आणि पुढे जा.’’ चांद पाटील उन्हातून चालत आला होता. थोडा वेळ निवांत व्हावं असा विचार त्याच्याही मनात आला होताच, त्यात हे निमंत्रण मिळाले तसा तोही फकिराशेजारी बसला. चांद पाटलाच्या खांद्याला लावलेले खोगीर पाहून फकिराने त्याला विचारले, “हे खोगीर कशासाठी?’’ त्यावर चांद म्हणाला, “माझे घोडे हरवलेय!’’

06-young-saibaba

शांतपणे चिलमीचा झुरका घेत फकीर स्वतःशीच बोलत असल्यासारखा पुटपुटला, “जा, त्या नाल्यात शोध, तिथेच असेल.’’ घोडीच्या हरवण्यामुळे अस्वस्थ झालेल्या चांद पाटलाने लागलीच जवळच्या नाल्याकडे धाव घेतली आणि त्यास आश्चर्याचा धक्का बसला. नाल्याजवळच्या गवतात त्याची लाडकी घोडी चरत उभी असल्याचे त्याला दिसले. चांद पाटलाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो धावतच घोडीपाशी गेला, तिला त्याने प्रेमाने कवटाळले व तिच्या पाठीवर खोगीर टाकून तिला घेऊन चांद पुन्हा त्या फकिरापाशी आला. चांद पाटलाने तिथल्याच एका झाडाजवळ घोडीस बांधले व तो पुन्हा फकिराजवळ येऊन बसला. त्याचे आभार मानण्यासाठी चांद पाटील काही बोलू जाणार एवढय़ात फकिराने स्वतःच्या हातातील लोखंडी चिमटा मातीत खुपसला आणि मातीतून जळता निखारा काढून चिलमीवर ठेवला. हे दृश्य पाहून चांद पाटील गडबडला, मात्र त्याच्या आश्चर्याला धुमारे फोडणारा आणखी एक प्रसंग अजून शिल्लक होता.

निखारा घातल्याने चिलीम गरम होऊ नये म्हणून सभोवती पाण्याने भिजलेले कापडी फडके (छापी) गुंडाळण्यात येते. त्या परिसरात पाण्याचे टिपूसही दिसत नव्हते अशा वेळेस हा फकीर पाणी कुठून मिळवणार याची चिंता आणि उत्सुकता चांद पाटलाला लागून राहिली होती. फकिराने मात्र शांतपणे स्वतःच्या हातातील चिमटा पुन्हा एकदा जमिनीत खुपसला, त्यासरशी एकाएकी पाण्याची चिळकांडी वेगाने हवेत झेपावली. त्या पाण्यामध्ये फकिराने फडके (छापी) ओले केले, पिळले आणि चिलमीला गुंडाळले. त्यानंतर फकीर निर्विकारपणे चिलीम ओढू लागला आणि पाटलासही देता झाला. चांद पाटलासाठी हे अजब होतं, अतर्क्य होतं, कल्पनेपलीकडचं होतं.

हा फकीर जगावेगळा आहे, अलौकिक सत्पुरुष आहे याची नोंद घेत चांदने लागलीच त्या फकिराचे पाय धरले आणि आपल्यासोबत घरी येण्याचा आग्रह तो, फकिराकडे करू लागला. फकिराने देखील चांद पाटलावर अनुग्रह करून त्याच्या घरी जाण्याचे निश्चित केले. चांदभाईच्या धूपखेड्यातील घरामध्ये लग्नसमारंभाची गडबड उडाली होती. चांदच्या पत्नीच्या भाच्यासाठी शिर्डीचे स्थळ आले होते. बोलणी निश्चित होऊन लग्नाची तयारी झाली. चांदभाईंचे कुटुंब सर्व वऱ्हाडी मंडळींसह आणि त्या फकिरासह शिर्डीत दाखल झाले. शिर्डीमध्ये खंडोबाच्या देवळापाशी लग्नाचे वऱ्हाड उतरले. जवळच म्हाळसापती भगताचे घर होते. वऱ्हाडासोबत गाडीतून आलेला हा फकीर खाली उतरला तेव्हा त्याच्यासमोर जणू स्वागतासाठी म्हाळसापतींनी उभे राहावे असे दृश्य घडले. दोघांचीही नजरानजर झाली आणि म्हाळसापतींच्या मुखातून अभावितपणे शब्द उच्चारले गेले, “आवो … साई !!!’’

 

आपली प्रतिक्रिया द्या