
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे दूध भेसळीच्या ठिकाणावर छापा घातल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी आत्तापर्यंत पाचजणांना ताब्यात घेतले असून, नव्याने पाचजणांची नावे समोर आली आहेत. यातील एकास अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या आता 11 झाली आहे. या दूधभेसळीची व्याप्ती नगरसह पुणे व सोलापूरपर्यंत पसरली असल्याचे तपासी अधिकाऱयांनी सांगितले.
काष्टी येथील संतवाडीतील बाळासाहेब पाचपुते अजून फरार असला, तरी अन्य पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आज नव्याने सतीश ऊर्फ आबा कन्हेरकर (रा. भगवानगाव, श्रीगोंदा), महेश मखरे (रा. मखरेवाडी, श्रीगोंदा), शुभम बोडखे (रा. श्रीगोंदा), समीर शेख (रा. राहुरी) व कैलास लाळगे (रा. शिरूर, जि. पुणे) यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील राहुरी येथील समीर शेख यास पोलिसांनी अटक केली आहे.
या छापेमारीमुळे तालुक्यातील दूधव्यवसाय, दूध डेअरी, संघ यांच्याशी निगडित व या गोरखधंद्यात सहभाग असलेले अनेक भाऊ, दादा, चेअरमन फरार झाले आहेत. पोलिसांच्या तपासात साहित्य पुरवणाऱयांची नावे समोर येत आहेत. ते पाहाता या दूध भेसळीची व्याप्ती अधिक जिह्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे.