‘महाराष्ट्र भिकारडे राज्य; विदर्भाचा विकास काय करणार?’

39

सामना प्रतिनिधी । नागपूर

महाराष्ट्र हे भिकारडे राज्य आहे. ते आपल्या विदर्भाचा विकास काय करणार, असा सवाल करत राज्याचे माजी ऍटर्नी जनरल श्रीहरी अणे यांनी फडणवीस सरकारवर आज हल्ला चढवला. ‘हे सरकार तर भिकारडे आहे’ असे जहाल उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

स्वतंत्र विदर्भासाठी १ मेपासून विदर्भ राज्य आघाडीने हाती घेतलेल्या रक्ताक्षरी अभियानाचा समारोप आज नागपुरातील संविधान चौकात झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा ३३ हजारांवरून ६६ हजारांवर गेला आहे आणि या भाजप सरकारला ‘बुलेट ट्रेन’ आणण्याची घाई लागली आहे अशा शब्दांत अणे यांनी संताप व्यक्त केला.

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी राज्याच्या उत्पन्नातील ६० टक्के वाटा जातो आहे. उरलेल्या ४० टक्क्यांतील अर्धा पैसा जीएसटीच्या रूपाने केंद्राला जातो आहे असे सांगून ते म्हणाले की, आता सर्व राज्यांना कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. या परिस्थितीमुळेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपच्या गोटात जाऊन बसले आहेत.

अच्छे दिन कदापि येणार नाहीत हे जनतेला आता पुरेपूर कळून चुकले आहे. यापुढे भाजपला प्रत्येक निवडणुकीत पराभूत करावे, असे आवाहन अणे यांनी केले. उन्मत्त भाजप कार्यकर्ते आणि त्यांचे पागल झालेले सरकार यांचेच दर्शन जनतेला रोज घडत आहे. गोवंशासाठी माणसे मारली जात आहेत. विरोधी विचारांच्या लोकांनाही संपवले जात आहे. कायद्याविरोधात सगळे घडत आहे.
– श्रीहरी अणे, माजी ऍटर्नी जनरल

आपली प्रतिक्रिया द्या