रासायनिक प्रक्रियेनंतरही अंबाबाईच्या मूर्तीची झीज सुरूच

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज सुरू असल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानंतरही पुन्हा झीज सुरू झाल्याने रासायनिक संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली की काय असा प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत. दोन वर्षानंतरही मूर्तीची झीज सुरू असून मूर्तीवर पांढरे डाग दिसत आहेत. तसेच रासायनिक थरही निघत आहेत.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली देवीची मूर्ती ही २ हजार वर्षांपूर्वीची आहे अशी आख्यायिका आहे. त्यामुळं मूर्तीची झिज झाल्यानंतर पुरातत्व खाते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं २०१५ साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या १०० वर्षात मूर्तीला काही होणार नाही असा दावाही करण्यात आला होता. मात्र आता मूर्तीच्या पायाचा भाग आणि गदेचे टोक झिजल्याचं दिसून आल्यामुळे संवर्धन प्रक्रियेबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

देवीच्या गाभाऱ्यातली आद्रता कमी करण्यासाठी देवस्थान समितीकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगत असली तरी दिवसेंदिवस भक्तांची वाढती गर्दी आणि गाभाऱ्यातील तपमानामुळे मूर्तीची झीज होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संवर्धन प्रक्रिया –

>२२ जुलै २०१५ ते ६ ऑगस्ट २०१५ या काळात मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली.
>पुरातत्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून प्रक्रिया करण्यात आली.
>पुरातत्व विभागने गाभाऱ्यातील तापमान कमी करण्यासाठी निर्माल्य आणि फुलांचा वापर टाळण्यास सांगितले.
>पुजेसाठी फक्त गायीच्याच दुधाचा वापर केला पाहिजे.
>देवीच्या दागिन्यांची संख्या कमी केली पाहिजे.
>आर्द्रता कमी करण्यासाठी गर्भकुडीतील पाण्याचा साठा कमी केला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या