श्री दत्त साखर शिरोळ उभारणार ऑक्सिजन प्लँट, दररोज 100 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती – अध्यक्ष गणपतराव पाटील यांची माहिती

राज्यासह कोल्हापूर जिल्हा व कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. काही रुग्णांना अशावेळी ऑक्सिजनची तात्काळ गरज असते, मात्र ऑक्सिजनअभावी बरेच रुग्ण अत्यावस्थ होत आहेत. ऑक्सिजन तुटवडा होऊ नये म्हणून श्री दत्त साखर कारखाना शिरोळ चार आठवड्यांत ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करणार आहे. दिवसाला 100 सिलेंडर ऑक्सिजन कार्यक्षेत्रातील रुग्णांना उपलब्ध होतील, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील (दादा) यांनी दिली.

कारखाना कार्यस्थळावर यासंदर्भात प्रकल्पाची माहिती देताना ते म्हणाले, माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी कोरोनाची राज्यातील गंभीर स्थिती आणि ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन साखर उद्योगातील कारखानदारांना ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँट उभारण्यासंदर्भात सुचना केल्या होत्या. दत्त साखर कारखान्याने नाशिक येथील मे साई नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी (एस.एन.सी.ई) या नामवंत कंपनीस हा प्रकल्प उभारण्याचे काम दिले आहे.

ताशी 25 मी. क्युबिक क्षमतेचा हा प्रकल्प असून लवकरच महिना अखेरीस प्रकल्प कार्यान्वित होऊऩ दररोज 100 सिलेंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कारखाना कार्यक्षेत्र तसेच शिरोळ तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिलासा देणारा ठरेल. तालुका आणि राज्यावर ज्या ज्या वेळी संकटकालीन परिस्थिती उद्भवते त्या वेळी दत्त साखर कारखान्याने नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आपले योगदान दिले आहे. नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा अवलंब करत आपली जबाबदारी म्हणून घरीच राहावे, सुरक्षित राहावे, अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील व खातेप्रमुख उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या