।। श्री साईगाथा ।। भाग १६वा-‘योगीराज’ सद्गुरू

साईबाबांच्या योगसामर्थ्याचा महिमा सांगायचा झाला तर बाबांच्या मशिदीतील झोपण्याच्या पद्धतीविषयी हटकून सांगावेच लागेल. बाबांची झोपण्याची पद्धत जगावेगळी व अतार्किक होती. मशिदीच्या आढय़ाला त्यांनी एक फळी झोपाळ्यागत टांगलेली होती. चार हात लांब आणि वीतभर रुंदीच्या या फळीची दोन्ही टोके एकमेकांना गाठी मारलेल्या अनेक चिंध्यांनी बांधलेली होती. त्यातच बाबांच्या मस्तकाजवळ म्हणजे उशाकडे व पायथ्याला अर्थात पायाजवळ पेटत्या पणत्या ठेवलेल्या असत.

या फळीवर झोपलेल्या बाबांना अनेकांनी अनेकदा पाहिले असलं तरीही त्यांना फळीवर चढून झोपताना वा झोप झाल्यानंतर पुन्हा फळीवरून उतरताना पाहणारा एकही ‘जीव’ साईसृष्टीमध्ये आढळला नाही. बरेचदा बाबा या फळीवर मान खाली घालून बसलेलेही दिसत असत. वीतभर रुंदीच्या आणि चार हात लांबीच्या फळीवर पेटत्या दिव्यांसह बाबा कसे झोपत असत? याची कल्पनाच केलेली बरी. ढीगभर चिंध्या एकत्र करून बांधलेली ती फळी साईबाबांचे वजन कसे पेलवत असेल हीसुद्धा चक्रावून टाकणारी गोष्ट होती.

16-saibaba

अष्टसिद्धीवर विजय मिळवलेल्या साईबाबांसाठी ही गोष्ट कमालीची सहजशक्य होती. स्वतःच्या शरीराचे खंडयोगाने असंख्य तुकडे करणाऱया या अवलियास स्वतःचे शरीर हलके करणे कितीसे अवघड ठरावे? म्हणूनच बाबा नेमके कोण होते हा प्रश्न वारंवार समोर येतो आणि साईंच्या दिव्यशक्तीची नोंद घेण्यास भाग पाडतो. साईंचे अनेक चमत्कार व लीलाप्रसंग सर्वसामान्यांच्या दृष्टीने कल्पनेपलीकडचे आहेत. यामागे कोणतेही तर्क-वितर्क करणे हा केवळ बुद्धीचा खेळ आहे. ‘अतर्क्य’ या एकाच शब्दाने तोलले जाणारे कित्येक लीलाप्रसंग साईंच्या अवतारकार्यात व चरित्रग्रंथात अनेक ठिकाणी विखुरल्याचे दिसून येते. त्यातही जे प्रसंग ग्रंथबद्ध झाले तितकेच आपल्याला ठाऊक आहेत आणि जे ग्रंथबद्ध झाले नाहीत त्यांच्याबद्दल आपण तरी काय बोलावे?

बाबा संसारकार्यापासून अलिप्त असले तरी त्यांचा लोकसंग्रह मात्र कमालीचा दांडगा होता. अवतीभवती असलेल्या भक्तांशी गप्पागोष्टी करण्याची तसेच थट्टामस्करी करण्याची बाबांना आवड होती. बाबांना अन्य कसलाही मोह नसला तरीही येणाऱया भक्तांविषयी त्यांना अपार प्रेम होते. ‘मी भक्तांसाठी काहीही करायला तयार आहे’ असे ते अनेकदा सांगत असत. साईबाबा अतिशय गोष्टीवेल्हाळ होते. दृष्टांत व रूपककथा सांगणे हे त्यांचे खास शैलीदार संभाषण असे. चार भावांची वा चार मित्रांची कथा ते अनेकदा आणि विविध प्रकारे सांगत असत. साईंची बोलीभाषा ग्रामीण ढंगाची होती. ‘मी आलु होतो, मी गेलु होतो. मला लई तरास देतात ही समदी लोकं, देव लई प्रेमळ हाये, तो समदं पाहातो’ ही व अशा धाटणीची वाक्ये ते नेहमी त्यांच्या संभाषणामध्ये पेरीत असत.

कुणाच्याही समस्येवर थेट भाष्य करण्यापेक्षा त्याला आपले म्हणणे गोष्टीरूपाने समजावून सांगणे हा त्यांचा स्थायिभाव होता. भक्तांसाठी आसुसलेले हे दैवत कायम भक्ताधीन होते व भक्तांचा अनुनय करताना दिसत असे. एकदा एका प्रसंगात कुणा एका भक्तास बाबा अतिशय नम्रपणे म्हणाले की, ‘मी तुम्हा दासांचाही दास आहे. तुमचा ऋणी आहे. खरं तर मी तुमच्या दर्शनासाठी इथं आलो आहे. तुमचे पाय या मशिदीला लागले ही तुमची मोठी कृपा. मी तुम्हा भक्तांच्या विष्ठsतील सामान्य किडा आहे. तुम्हा भक्तांची भेट झाल्यामुळे माझे येथे आगमन करण्यामागचे प्रयोजन सफल झाले आहे अन् मी धन्य झालो आहे.’ किती ही साईंची लीनता, किती ही विनम्रता?

गंमत म्हणजे एकदा नानावल्ली नामक भक्ताने बाबांना त्यांच्या आसनावरून उठवले व तो स्वतः तिथे जाऊन बसला. त्यावर बाबा काहीही बोलले नाहीत. ते निमूटपणे उठले आणि उभे राहिले. पुढे नानावल्लीस पश्चात्ताप होऊन त्याने बाबांचे आसन सोडले व त्यांचे चरण धरले. तेव्हादेखील बाबा अतिशय प्रेमळपणे नानावल्लीस आशीर्वाद देते झाले. ‘अल्ला मालिक है। अल्ला तेरा भला करेगा।’.

 विवेक दिगंबर वैद्य

 

आपली प्रतिक्रिया द्या