।। श्री साईगाथा ।। भाग १७ वा- बाबांची द्वारकामाई

शिर्डीसारखे आडवळणी गाव साईबाबांच्या वास्तव्यामुळे पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आले. येथे दर्शनार्थींची अहोरात्र यात्रा चालत असे. अनेक सन्मार्गी पुण्य प्राप्त करण्यासाठी साईदर्शनार्थ येत असत तर प्रापंचिक समस्येने गांजलेले आणि वैयक्तिक दुःखाने पोळलेले कित्येक संसारीजन भयमुक्त होण्यासाठी शिर्डी क्षेत्रास भेट देत असत. साईबाबांच्या रूपाने शिर्डीमध्ये साक्षात कल्पवृक्ष अवतरला होता आणि बाबांची मशीद ‘द्वारकामाई’ म्हणून नावारूपास आली होती. यास पुष्टी देणारा एक प्रसंग घडला तो पुढीलप्रमाणे,

नगरचे सरदार मिरीकर यांचे चिरंजीव बाळासाहेब कोपरगाव प्रांताचे मामलेदार होते. चिथळी गावच्या दौऱयावर जातेवेळी वाटेत ते बाबांच्या दर्शनार्थ शिर्डीस आले. मशिदीत जाऊन त्यांनी साईंचरणी मस्तक ठेवले. त्यावेळी तेथे बरीच मंडळी उपस्थित होती आणि त्यांच्यासोबत बाबांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. त्यादरम्यान, एकाएकी बाबा म्हणाले, “आता पहा, द्वारकामाई म्हणजे आपली मशीद. ही द्वारकामाई, तिच्या मांडीवर बसलेल्या लेकरांना निर्भय करते आणि त्यांच्या मनात कसलीही चिंता येऊ देत नाही. ही मशीदमाऊली लई कृपाळू आहे बरं! भोळ्या भाविकांची ती आई आहे. कुणी संकटात पडला की, ही मशीदमाई त्याचं रक्षण करते. जो कुणी एकदा तिच्या मांडीवर बसला त्याचा बेडा पार झाला समजा. या मशिदीच्या सावलीत जो विसावेल तो मस्त आरामात गादीवर बसेल हे लक्षात ठेवा. हीच द्वारका आहे आणि हीच द्वारावती आहे.’’ असे म्हणत बाबांनी मिरीकरांना उदी दिली आणि त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला.

17-balasaheb-mirikar

मिरीकरांना चिथळीला जाण्याची घाई असल्याने साईंचा निरोप घेऊन ते वळणार इतक्यात बाबांनी त्यांना “तुम्हाला लांब बावा व त्याचे आश्चर्य ठाऊक आहे काय?’’ असे विचारले आणि डाव्या हाताची मूठ वळवून त्यास कोपरापाशी उजव्या हातात धरून चहूकडे फिरवीत बाबा म्हणाले, “असा तो भयंकर असतो. तो आपले काय करतो? आपण द्वारकामाईची पिले आहोत. तिची करामत कोणाला कळत नाही. आपण गप्प बसून कौतुक तेवढे पाहावे. द्वारकामाई वाचविणार असल्यास लांब बावा मारू शकेल काय? तारणाऱयापुढे मारणाऱयाचा इलाज चालेल काय?’’ तिथे उपस्थित मंडळींना बाबांचे हे सूचक बोलणे समजले, परंतु त्यामागचा संदर्भ उमगला नाही.

मिरीकरांचेही तसेच झाले. म्हणून तेही अधिक काही न बोलता बाबांना वंदन करून निघाले. मिरीकर व माधवराव देशपांडे थोडे दूर गेले असता बाबांनी माधवरावांना बोलावले व म्हणाले, “शाम्या, तूसुद्धा तयारी कर आणि त्याच्याबरोबर जा. चिथळीस फेरी मारून ये. फार मजा येईल.’’ तेव्हा माधवराव मिरीकरांपाशी गेले आणि म्हणाले, “बाबांनी मला आपल्यासोबत जायला सांगितले आहे.’’ त्यावर मिरीकर त्यांना म्हणाले, “आपण इतक्या दूर येऊन काय करणार? आपणाला त्रास होईल.’’ मिरीकरांचे हे बोलणे माधवरावांनी बाबांना सांगितले त्यावर बाबा म्हणाले, “बरे झाले. आपले त्यात काय गेले? जशी श्रद्धा, विश्वास असेल तसे फळ प्राप्त होते. आपण कल्याण करण्याच्या हेतूने योग्य तो उपदेश करावा. मात्र ज्याच्या कर्मात असेल तसेच घडेल.’’ बाबांचे हे बोल म्हणजे आपल्यासाठी काही संकेत असावा हे जाणून मिरीकरांनी माधवरावांना सोबत घेतले. दोघेही चिथळीस रवाना झाले. मात्र पोहोचेपर्यंत रात्रीचा एक प्रहर उलटला.

मिरीकरांची सोय गावच्या देवळात केली होती. मिरीकर व माधवराव गप्पागोष्टी करीत असताना तिथे अचानक एक लांबलचक सर्प आला व मिरीकरांच्या उपरण्यावर वेटोळे घालून बसला. त्याच्या सळसळीमुळे शिपायाला संशय आला व त्याने दिव्याच्या प्रकाशात पाहिले असता त्यास सर्परूपी ‘लांब बावा’ मिरीकरांच्या दिशेने सरकताना दिसला. शिपायाने आरडाओरड करताच सर्वांनी हातातील काठय़ा सरसावल्या व सर्पास भुईसपाट केले. माधवरावांसोबत गप्पा करण्याच्या हेतूने जागे राहिल्यामुळे आपण जिवावरच्या प्रसंगातून वाचलो याची जाणीव आणि साईंनी केलेला संकेत या दोन्ही घटनांचा अर्थ उलगडल्याने मिरीकरांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

 विवेक दिगंबर वैद्य

 

आपली प्रतिक्रिया द्या