स्वामी समर्थांच्या रुपात मला माझे आजोबा दिसतात-नर्तक मयुर वैद्य

269

> तुमचा आवडता देव?

देवावर विश्वास आहे. मी स्वामी समर्थांना मानतो.

> त्याचं कौतुक कशा पद्धतीने कराल?

त्यांचं कौतुक मला आजोबा म्हणून जास्त करायला आवडेल, कारण मी माझ्या आजोबांना बघितलंच नाही. त्यामुळे त्यांना बघितल्यावर ते माझे आजोबा असल्याचं फिल करतो.

> संकटात ते कशी मदत करतात, असं वाटतं?

माझा एवढा विश्वास आहे त्यांच्यावर की, माझ्यावर आलेलं संकट मी त्यांच्यावर टाकतो. ते मला त्याच्यातून तारतील म्हणून मी बिनधास्तपणे जगतो.

> कला, भक्तीची सांगड कशी घालता?

संगीत हे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं भक्कम साधन आहे. हा आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग असून त्यातून नृत्य प्रकटतं. कारण नृत्यातून पूर्णांगाच्या रूपात देवाला भक्ती वाहतो. अक्कलकोटला स्वामींच्या गाभाऱ्याच्या समोर नृत्य करण्याची संधी मिळाली. याआधी कोणीही गाभाऱ्यात नृत्य केलेलं नाही. स्वामींच्या भजनांवर आधारित नृत्य केलं. ठाण्यातील नाना करंदीकर यांनी लोणावळ्याला मठ बांधलाय. तिथे स्वामींची उभी मूर्ती आहे. उज्वलाताई दाते या मठाचं काम पाहतात. त्यांनी ‘लक्ष लक्ष पावलांची कथा’ हा कार्यक्रम आयोजित केलाय. यामध्ये स्वामींचं वर्णन आहे. नाना करंदिकरांनी सुरू केलेल्या पदयात्रेत त्यांना स्वामींचे अनुभव आले जे त्यांनी पुस्तकात मांडलेत. यावेळीही अनेकांना चंदनाचा सुवास येतो. आध्यात्मिक अनुभव येतात. हा अनुभव लोकांना माझ्या नृत्यातून दिसतो.

> कला साकारण्याकरिता त्यांची कशी मदत होते?

एखाद्या गोष्टीवर विश्वास असावाच लागतो, मग ते माता-पिता असू देत किंवा निर्जीव वस्तू असू देत. माझा स्वामींवर शंभर टक्के विश्वास आहे. कधी कधी ‘हे होईल का’, अशी शंका येते तेव्हा  दुसऱ्या क्षणी मी तरलेले असतो. एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये. कला सादर करताना स्वतःवर विश्वास असणं सगळ्यात महत्त्वाचं. विश्वास रियाजानेच निर्माण होतो. रियाज आणि यश हाच देव आहे, असं मला वाटतं.

> प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग?

अनेक वेळा स्वामींच्या गाण्यांवर कार्यक्रम सादर केलाय. तेव्हा मी स्वामींना म्हटलं, मला अक्कलकोटमध्ये तुमच्या दारात कार्यक्रम करायचाय. मला मंदिरात नृत्य करायला आवडतं. मला स्वामींच्या मठात आणि विठ्ठलमंदिरातील गाभाऱ्यात नृत्य करण्याची संधी मिळाली. ही संधी मिळणारा मी पहिला नर्तक आहे.

> त्यांच्यावर रागावता का?

हो जेव्हा एखादी गोष्ट होत नाही तेव्हा रागावतो.

> स्वामी तुझे लाड कसे पुरवतात ?

ज्या स्तरावर आज मी आहे, ही त्यांचीच इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेनेच पुढे जे व्हायचे ते होईल. हे सगळे लाडच आहेत.

> आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते?

स्वामींचं सौम्य रूप आणि लक्ष्मी रूप.

> त्याच्यापाशी काय मागता?

ज्यांच्याकडे जे नाही ते त्यांना द्या आणि कलेत जे अपूर्ण आहेत त्यांना पूर्णत्वाकडे न्यायला तुम्ही मदत करा, हेच मागणं मागतो.

> त्याच्या आवडीचा नैवेद्य काय देतोस?

स्वामींना पुरणपोळी आवडते, म्हणून मलाही पुरणपोळी आवडते.

> त्याची नियमित उपासना कशी करता?

रोज त्यांच्या पाया पडतो. मंत्र म्हणतो. जेव्हा जमेल तेव्हा मठात जातो.

आपली प्रतिक्रिया द्या