काल्याचे कीर्तन, महाप्रसाद आणि कल्याणोत्सवाने जिर्णोद्धार व पुन:प्राणप्रतिष्ठापना महोत्सवाची सांगता

सामना प्रतिनिधी । लातूर

गावभागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात गेल्या 8 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या जिर्णोद्धार व पुन:प्रतिष्ठापना महोत्सवाची काल्याचे कीर्तन, महाप्रसादाचे वितरण आणि कल्याण उत्सवाने शुक्रवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सांगता झाली.

विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन तथा श्रीराम कथेच्या मुख्य यजमान श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, महापौर सुरेश पवार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी आदींनी शुक्रवारी श्री व्यंकटेश बालाजींची पूजा केली.

कीर्तन महोत्सवात गुरूवारी रात्री महेश महाराज आरजखेडकर यांचे कीर्तन झाले.

काल्याचे कीर्तन शुक्रवारी सकाळी झाले. या कीर्तनात बोलताना संजय महाराज उमरखेडकर यांनी जीवनातील अंधार दूर करण्यासाठी रात्रीचे कीर्तन असते आणि काला करण्यासाठी सकाळी काल्याचे कीर्तन असते असे सांगितले. अज्ञानाची रात्र घनदाट आहे. हा अंधार नाहीसा करण्यासाठी रात्रीच्या कीर्तनातून प्रयत्न केला जात असल्याचे महाराज म्हणाले. गेल्या आठ तारखेपासून सुरू असलेल्या या महोत्सवात रामायणाचार्य ढोक महाराज यांची रामकथा सात दिवस चालली. कीर्तन महोत्सवात अनेक नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावून कीर्तनाची सेवा दिली. या सर्व कार्यक्रमांना भाविक-भक्तांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली.

या काल्याच्या कीर्तनानंतर कथा मंडपात भाविकांना महाप्रसादाचे वितरण पंक्तीने करण्यात आले. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात कल्याणोत्सव अतिशय मंगलमय वातावरणात पार पडला. या महोत्सवात सर्व विधी तिरूमल्ला तिरूपती बालाजींच्या धरतीवर पार पडले. या विधीसाठी दक्षिण हिंदुस्थानातून तसेच तिरूमल्ला तिरूपती येथून पुजाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. तिरूपती प्रमाणेच लाडूचेही वाटप भाविकांना करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सचिव विनोद अग्रवाल, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी, सर्व विश्वस्त, महोत्सव संयोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी परिश्रम घेतल्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाल्याचे विनोद अग्रवाल म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या