Crime news उशिरा का आला? विचारताच मजुराचा मालकाच्या आईवर चाकू हल्ला, आरोपीला अटक

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील गणपती कारखान्यात कामाला असलेल्या मजुराला कामावर उशिरा का आला? असे विचारल्याचा राग आल्याने त्याने मालक खंडू चंदन यांच्या आईवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला दोन तरुणांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या हवाली केले. मयूर संजय भागवत (रा. शिवाजीनगर,नगर) असे आरोपीचे नाव आहे.

दगरम्यान, याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात खंडू चंदन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट देऊन पाहणी करत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांना तपासाबाबत सूचना केल्या.

फिर्यादी यांचा गणपती कारखाना असून सुट्टीवर गेलेला कामगार वेळेत परत आला नाही. त्यामुळे कारखाना मालक खंडी चंदन यांच्या आई ताराबाई यांनी त्याला जाब विचारला. यामुळे राग आलेल्या आरोपीने तुम्हाला बघून घेईन असे म्हटले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास येऊन चाकूने मानेवर आणि हातावर वार केला. ताराबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबीय आणि आजूबाजूची लोकं धावतपळत आली. यादरम्यान हातातील चाकू तिथेच टाकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला फिर्यादीचे चुलत भाऊ आकाश आणि शेजारी राहणाऱ्या गौरव पुरी यांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या हवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे हे करत आहेत.