भटकेगिरी

182

द्वारकानाथ संझगिरी, [email protected]

श्रीलंकेतील वेड लावणारा निसर्ग…

माझे श्रीलंकेतले अनुभव वाचून अनेकांनी मला म्हटले, ‘श्रीलंका फिरायची इच्छा झालीय.’’

माझं उत्तर आहे इच्छा असेल तर ती पूर्ण करा. मुळात श्रीलंका फारशी खर्चिक नाही, पण युरोप पाहण्याच्या आर्विभावात तिथे जाऊ नका. केरळाचा एक भाग आपण पाहतोय ही तुमची भावना होईल. बसमध्ये बसलात तर गोव्याचा अनुभव येईल आणि सध्या तर तो पर्यटकांचा देश झालाय. तसा तो पूर्वीही तामीळ प्रश्नाची आग त्यांना भाजून काढत होती तेव्हाही होती. कारण त्यांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने रबर, चहा आणि पर्यटनावर आधारलेली आहे. माझा श्रीलंकेतला पहिला अनुभव सांगतो. साल अर्थात १९८५. ‘ताज समुद्र’मध्ये मी राहायला जायच्या अगोदर. ‘रानवान’ नावाच्या हॉटेलात गेलो. मुंबईहून पहाटे चारचं विमान होतं. ताज्या पहाटे मी कोलंबोजवळच्या काटुनायके विमानतळावर पोहोचलो. त्यावेळी विमानतळ अगदीच छोटा आणि रेल्वे स्टेशनच्या दर्जाचा होता. आता तो अत्याधुनिक आहे. आता तिथे ‘फॉरेन’ला उतरलोय असं जाणवतं. तेव्हा हैदराबाद, बंगलोरला उतरलोय असं वाटायचं. आता हैदराबाद-बंगलोरच्या विमानतळांनी केवढी कात टाकलीय. धर्मशाळेचं फाइव्ह स्टार हॉटेल व्हावं तसं झालंय. त्यामुळे तिथल्या एका टुरिस्ट कोडरने खिशाला परवडेल असं दाखवलेल्या हॉटेलात गेलो. नाव ‘रानवन’ असलं तरी भर वस्तीत होतं. सकाळची वेळ. मी रूममध्ये सामान फेकलं आणि झोपलो. रात्री क्षणभरही झोप मिळाली नव्हती. त्यामुळे ताणून दिली. दुपारी बारा-एकच्या सुमारास उठलो. ताजातवाना होण्यासाठी मी चहा मागवला. वेटरने टेबलावर चहा ठेवला आणि मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये विचारले, ‘मुलगी हवीय?’ डोळय़ांवर झोप होती. दुपारचा एक वाजलाय. डोळय़ांसमोर विमानतळावर निरोप घेणाऱया बायकोचा हलणारा हात अजून डोळय़ांसमोर दिसतोय आणि तो मला विचारतोय, ‘मुलगी हवी का?’

मी म्हटलं, ‘इतक्या दुपारी?’

त्याने माझ्या म्हणण्याचा सोयीस्कर अर्थ घेऊन उत्तर दिलं, ‘ठीक आहे. मी रात्री येतो, पण आमच्याकडच्या दर्जेदार मुली तरी पाहा.’ म्हणून त्याने टाळी मारली. दोन सावळय़ा मुली रूममध्ये आल्या. माझ्या डोळय़ांवरची झोप चहापेक्षा झाल्या प्रकाराने लवकर उडाली. बरं, अनोळखी शहर, अनोळखी माणसं. वर तामीळ प्रश्नाचं टेन्शन. प्रत्येक हिंदुस्थानी हा ‘जाफना’ गिळायलाच आलाय हा त्यांचा समज असेल तर? आमचा डीएमकेसी कार्डाचा संबंध नसतो हे त्यांना कळलं नाही तर. त्यामुळे वेटरवर न खेकसता साने गुरुजींकडून शांतपणा आणि मनाचा मोठेपणा उसना घेतल्याच्या थाटात मी त्याला नकार दिला. माझ्या नकारात होकार आहे असा गैरसमज न करून घेता तो वेटर निघून गेला. थोडय़ा वेळाने माझ्यातला पत्रकार जागा झाला. मी वेटरला पुन्हा बोलावलं आणि विचारलं, ‘हा प्रकार काय आहे?’

तो म्हणाला, ‘इथे हे सर्रास चालतं. इथे पर्यटक येतात. बोटीवरचे खलाशी येतात. त्यांना हे सर्व हवं असतं. त्यामुळे आम्ही इथेच मुली ठेवतो. (वा! केवढा पाहुणचार!) बऱयाच हॉटेलमध्ये तुम्हाला इथे हे दिसेल.’

ताजसारख्या दर्जेदार हॉटेलात हा प्रकार नव्हता, पण काही चार तारांकित (फोर स्टार) हॉटेलात हे प्रकार मसाज पार्लरच्या नावाखाली चालतात. ‘ताज’मधून बाहेर पडल्यावर दोन जमाती आधी आडव्या येतात. एक रिक्षावाले, दुसरे ‘वेश्यां’चे दलाल. जगातला हा सर्वात जुना व्यवसाय जगातल्या प्रत्येक देशात आहे. मी सौदी अरेबियाला गेलेलो नाही. जायची इच्छाही नाही, पण तथाकथित कर्मठ पाकिस्तानात लाहोरला हे हॉटेलात राजरोसपणे चाललेलं मी पाहिलंय. श्रीलंकेत वेश्याव्यवसायाला बंदी आहे, पण बंदी फक्त कागदोपत्री असते. माझ्या एका रंगेल फोटोग्राफर मित्राचा असाच एक किस्सा. त्याने तिथल्या एका महिला पोलिसाशीच सूत जुळवलं.  तेव्हा मी हतबद्ध झालो. मी त्याला म्हटलं, ‘भीती नाही वाटली?’ तो म्हणाला, ‘कसली भीती?’ तो म्हणाला, ‘तीही माणसंच आहेत ना? त्यांनाही भावना असतात, पण ते शोधण्यासाठी ती दृष्टी (आयसाइट) लागते.’ मी त्याला म्हटलं, ‘इतकी चांगली आयसाइट असताना फक्त फोटोग्राफी का करीत राहिलास? मैदानावर बॅटिंग केली असतीस तर खोऱयाने धावा काढल्या असत्यास.’ आता ‘जाफना’ मुक्त झाले. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ श्रीलंकेत वाढली. कॅसिनोज आले. ताजजवळचं कोलुपिटिया आता रात्री फार फार उशिरा झोपते. तिथले कॅसिनोज पर्यटनाच्या दृष्टीतून श्रीलंका किती सुधारलंय त्याची ग्वाही देतात, पण कोलंबो हा बँकॉक नाही.

ते बौद्ध आहेत. त्यांना श्रीलंकेला सिलोन म्हटलेलं आवडत नाही. ती जुनी पारतंत्र्याची खूण वाटते, पण प्रत्येक क्रिकेटच्या मैदानावर बीयर मुक्तपणे मिळते, पण चहा नाही. श्रीलंका जगातला सर्वोत्कृष्ट चहा तयार करते. टी गार्डन्समध्ये जाऊन मी अप्रतिम चहाचं टेस्टिंग केलंय. ‘दिलमा’ चहा तर दिल खूश करतो, पण मॅचला चहा शोधणं ही गोष्ट आदित्यनाथ योगीला सुटाबुटात फोटो शोधण्याएवढी कठीण आहे आणि मिळाला तर साहेबांप्रमाणे कोरा मिळतो. सिंहली बीयर मात्र वाहत असते. तिथे ७० टक्के बौद्ध असले तर जैनांप्रमाणे खाण्याच्या बाबतीत अहिंसक नाहीत. सकाळी ब्रेकफास्टला स्ट्रिंग हॉपर्सबरोबर ते माशाचं कालवण मिसळून खातात. प्राण्यांच्या बाबतीतही भेदभाव नाही. त्याबाबतीत डच, पोर्तुगीज, ब्रिटिश संस्कृती त्यांनी जवळ केली आहे. त्यांच्यात वेस्ट इंडीयन माणसांचा ऱहीदम आहे. मॅचच्या वेळी वाजणारं बॅण्ड आणि त्यावर नाचणारे श्रीलंकन पाहा. त्यांची शरीरंही थोडं कमी भरलेल्या धान्याच्या गोणीसारखी असतात. शरीर कुठूनही सुटायला त्यांनी मुक्त वाव दिलेला असतो, पण संगीताच्या तालावर ते नाचायला लागले की त्यांचं शरीर तालबद्ध आणि मस्त वाटतं.

हीच गोष्ट मी काळय़ा माणसात अनुभवली आहे. पोटात बीयर असेल तर लयबद्धता आणखीन वाढते. श्रीलंकेला जाऊन प्रेक्षकांत बसून मॅच पाहण्यात एक वेगळी गंमत आहे. अर्जुना रणतुंगाचे पोट तो खेळतानाही छोटय़ा नगाऱयासारखं वाटायचं, पण एकेरी धाव चोरताना तो मला धावचीत झालेला आठवत नाही. दुलिप मेंडीस वर्षावर्षाला कपडे उसवत असतील, पण स्क्वेअर कट किंवा पूल मारताना तो चेंडू इतक्या जोरात हाणत असे की चेंडूवर उठलेल्या वळाची काळजी वाटे. जयसूर्याचे फटके पाहून काहींना त्याने बॅटमध्ये प्रिंग बसवलीय असं वाटायचं. नंतरची त्यांची पिढी व्यायाम आणि ट्रेनिंगने स्लीम ट्रीम झाली. पण मूळ अंगलट, शरीर विस्तारणारीच. त्यांचं खाणं त्यासाठी रुबाबदार असावे. त्या खाण्यात पाश्चात्य आणि दक्षिण हिंदुस्थानी संस्कृतीचा मिलाफ होता.

श्रीलंकेला जाच! निसर्ग तुम्हाला वेड लावेल. विमानातून काटुनायकं विमानतळावर उतरताना खाली जे दृश्य दिसतं ते निसर्गाने केलेलं करोडोंचे पेंटिंग दिसते. डोलणारी नारळाची झाडं आणि मयूरपंखी समुद्र, त्यातून तुम्हाला फिरवून आणतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या