अर्जुन: एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन

2584

>> प्रतीमा वामन

भगवद्गीता हा हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला गेलेला ग्रंथ आहे. हिंदुस्थानी तत्त्वज्ञानामध्ये फार प्राचीन काळापासून माणसाच्या मनःस्थितीविषयी विविध पद्धतीने विचार करण्याची एक सलग अशी परंपरा आपल्याला दिसून येऊ शकते. त्याच परंपरेत असून अत्यंत उत्तम प्रकारे अर्जुनाच्या व्यक्तिमत्त्वातून मार्गदर्शन करण्याचे काम भगवद्गीता करीत आहे.

कुरुक्षेत्राच्या रणांगणतील युद्ध हे अर्जुनासाठी धर्म-अधर्माचं युद्ध नव्हतं तर दोन धर्मांमधील युद्ध होतं. हे या आधी देखील अनेकांनी सांगितलं आहे. त्यामुळे गीतेमध्ये अर्जुनाच्या मानसिक पातळीवरील अवस्था ही द्वंद्व असल्याचे आपण पाहू शकतो. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात या पद्धतीचे लहान–मोठ्या प्रकारचे प्रसंग येत असतात. त्या प्रत्येक वेळी भगवद्गीता ही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते.

या सर्व प्रक्रियेकडे जाण्यापूर्वी अर्जुनाची मोहग्रस्त स्थिती होणे याला सध्याच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचे वाटले. म्हणजेच अर्जुनविषादाचे वर्णन गीतेमध्ये जे येते त्यामागे काय मानसिक स्थिती असू शकेल याचा अंदाज घेणे. हा अंदाज आला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःला अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या मार्गदर्शनाला जोडणे सहजसाध्य होऊ शकेल असे वाटते.

भगवद्गीतेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे सर्वात सुरुवातीला रणांगणात सर्वजण उभे असताना शंख फुंकून युद्ध सुरू झाल्याची ग्वाही दिली गेली आहे. अर्जुन स्वतःदेखील कर्तव्यदक्ष अशा भावनेने युद्धाला सुरुवात करीत होता. त्यानंतर अर्जुन स्वतः श्रीकृष्णाला रथ रणांगणात मध्यभागी घेऊन जाऊन कोण लढणार आहेत हे पाहतो. या संपूर्ण परिस्थितीमध्ये अर्जुनाची मानसिक स्थिती कोणत्याही ठिकाणी विचलित असल्याप्रमाणे वाटत नाही. कर्तव्यदक्ष असा अर्जुन युद्ध करण्याच्या दिशेने चालत असतो.

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः|

पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः || .गी. १५ ||

ज्यावेळी तो त्याचा रथ युद्धभूमीवर मध्यभागी उभा करून समोरच्या सर्व कौरव बंधू व इतर आप्तजन, स्वकीय यांना पाहतो त्यावेळी मात्र त्याच्या मनाची पूर्वी असलेली स्थिती ढासळते. तो मानसिकरीत्या विचलित होतो.

त्या प्रसंगापूर्वी अर्जुनाला परिणामांची कल्पनाच नव्हती अशी स्थिती मुळीच असल्याचे दिसत नाही. परंतु जेव्हा तो युद्ध–भूमीवर उभा राहून परिणामांची कल्पना करतो. त्याला स्वतःला त्याचा अनुभव काय असू शकतो याची पूर्ण कल्पना येते (Visualisation). त्यावेळी त्याची असलेली मानसिक स्थिती ढळते. यात अजुर्नला स्वत:च्या पराभवाचा विचार शिवतही नाही म्हणून तर तो सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्।‘ (. गी. २४) म्हणतो. त्याच्या मनामध्ये दोन करणीय गोष्टींच्या प्रेरणा उत्पन्न होतात. कर्तव्यदक्ष होऊन युद्ध करणे किंवा स्वतः युद्ध न करता तेथून निघून जाणे अशा द्विधा मनःस्थितीतून तो जात असतो.

कुल क्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः |

धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोSभिभवत्युत || (भ. गी. १–३९)

एका बाजूला त्याला आपली सत्याची बाजू, झालेला अन्याय, स्वतःचे कर्तव्य या गोष्टी दिसतात तर दुसरीकडे त्याचे परिणाम आपल्याच कुलाचा क्षय होणार आहे. त्यातून तो मीच करणार आहे. या सर्वांतून जी धन–संपत्ती, राज्य मिळेल त्या सर्वांचा उपभोगही इतर सर्व आप्तजनांना सोडून मला घ्यावा लागू शकेल अशा पद्धतीचे विचार येतात.

या सर्वांतून मानसशास्त्रीय भाषेत त्याची ‘द्विधा प्रगमन – वर्जन संघर्षाची स्थिती’ निर्माण झाली असावी असे वाटते (Double Approach Avoidance Conflict). या संघर्षात दोन उद्दिष्टे किंवा दोन पर्याय व्यक्तीसमोर असतात. दोन्ही पर्यायांचे काही गुणांमुळे सारखेच आकर्षण असते तर दोन्ही पर्यायांमधील काही दोषांमुळे सारखेच अनाकर्षण दिसते. एकाच वेळी दोन्हीही पर्यायांमधील आकर्षण– अनाकर्षणामुळे नेमका कोणता पर्याय निवडावा असा संघर्ष निर्माण होतो. त्याला ‘द्विधा प्रगमन – वर्जन संघर्ष’ असे म्हटले जाते.

अशाच पद्धतीचा काही प्रमाणात संघषं अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला असल्याचे दिसून येते. या तणावाचा अर्जुनावर सर्वच बाबतीत परिणाम झालेला दिसून येतो. त्याची लक्षणे म्हणजे अर्जुनविषादामध्ये वर्णिलेली सर्व स्थिती– अवयवांना कंप सुटणे, मुखशोष पडणे, मनामध्ये काहीच न सुचण्याची परिस्थती निर्माण होते. अशा सर्व लक्षणांवरून अर्जुनाची तणावग्रस्त व वैफल्यग्रस्त अशी परिस्थिती असल्याचे दिसून येते. जी त्याच्या मनात सुरू असलेल्या प्रेरणांच्या संघर्षाचे फलित असल्याचे स्पष्ट होते.

अर्जुनाच्या तणावग्रस्त परिस्थितीची परिसीमा गाठलेली काही संदर्भांवरून दिसून येते. ते म्हणजे अर्जुनाचा मित्र असलेला– गुरू असलेला असा श्रीकृष्ण तिथे असूनसुद्धा त्याला पण स्वतःच्या मनाची परिस्थिती अर्जुनास सांगता येत नव्हती, इतका तो तणावाने ग्रस्त झालेला होता.

त्यानंतर विविध पद्धतीने तो स्वतःच्या बोलण्यातून त्याच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कल्पना देताना दिसतो. भविष्याच्या परिणामांबाबत तो बोलताना दिसतो; परंतु सुरुवातीला स्वतःच्या मनात चाललेला संघर्ष बाहेर कळू देत नाही. त्यानंतर त्याचा मित्र, गुरू असलेल्या श्रीकृष्णाने दोनवेळा त्याला आपल्या वचनातून हटकलेले – तू करीत असलेला विचार आणि जे कर्म करण्याकडे चालला आहेस ते योग्य नाही. त्या कर्माकडे जाणे हे चुकीचे आहे. तुला करणीय असे ते नाही. असे सर्व श्रीकृष्ण बोलेपर्यंत अर्जुन स्वतः आपली समस्या बोलूनही दाखवत नाही.

श्रीकृष्ण असे म्हणेपर्यंत स्वतःच्या मनात निर्माण झालेला संघर्ष व त्यातून त्याने काढलेल्या उपायाचे समर्थन तो करताना दिसतो. त्याला श्रीकृष्णाने ‘प्रज्ञावाद’ म्हटले आहे. करण्याच्या गोष्टीबद्दल त्याने सुरुवातीला स्वतःच्या मनाला समजावले व नंतर त्याप्रमाणे वागण्याचे समर्थन केले. अशी परिस्थिती अर्जुनाची गीतेत दाखविली आहे.

या अर्जुनाने स्वतःच्या मनाची स्थिती लपवून मोहग्रस्त झालेल्या परिस्थितीतच घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना दिसतो. या त्याच्या क्रियेला ‘प्रतिपक्ष भावन’ व स्वतःच्या निर्णयाला पुष्ट करण्याकरिता उभी केलेली ‘संरक्षण यंत्रणा’ असे म्हणता येऊ शकेल. या पद्धतीच्या वागण्यामध्ये जे कार्य केलेले आहे अथवा करायचे आहे त्याला समर्थन करता येईल अशा पद्धतीची रचना ती स्वतः व्यक्ती निर्माण करते. याला संरक्षण यंत्रणा (Reaction formation and Defence Machanism) म्हटले आहे . या अर्जुनाच्या अशा प्रकारच्या वागण्यानंतर श्रीकृष्णाला अर्जुनाची स्थिती पूर्ण लक्षात येऊन अर्जुनाला त्याच्या मनातील चुकीच्या दिशेने चाललेल्या विचारांची जाणीव करून देण्याची गरज वाटते. मग तो त्या पद्धतीने अर्जुनाशी बोलायला सुरुवात करतो.

त्यावेळी आपल्याला श्रीकृष्णाच्या ठिकाणी असलेला समुपदेशक जणू प्रत्ययास येतो. एखाद्या समुपदेशकाचे असे बोलणे हे आपणास केव्हा पाहावयास मिळते, तर ज्यावेळी सल्लार्थी व समुपदेशक यांचा एकमेकांशी योग्य तो मेळ जुळल्यानंतरच (rapport) पाहावयास मिळू शकते. अशाच प्रकारे संदर्भ आधुनिक मानसशास्त्रात आपल्याला देते. त्याचाच प्रत्यय श्रीकृष्ण व अर्जुनाच्या नात्यातून व या संवादातून येतो.

अशा पद्धतीचे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकल्यानंतर अर्जुन खरी परिस्थिती वर्णित करतो आणि धर्म व अधर्म काय आहेत ते तू मला सांग. अशा पद्धतीने विनंती करतो आणि शरणागत पद्धतीने श्रीकृष्णाला मार्गदर्शन करावयास विनंती करतो. अर्जुनाच्या मनात त्यावेळी जे जे प्रश्न उत्पन्न झाले त्या प्रश्नांमुळे जी त्याची मनःस्थिती तयार झाली ती सर्व परिस्थिती मानवी आयुष्यात अनेक वेळा येताना दिसते असे मानसशास्त्र देखील सांगते. या अशा सर्व परिस्थितीतून वेगवेगळ्या मार्गाने श्रीकृष्ण अर्जुनाला ‘मोहग्रस्त’ स्थितीतून बाहेर काढतो. सर्वात शेवटी अर्जुन स्वतःचा ‘मोह संपला, स्मृती प्राप्त झाली’, असे म्हणून स्वतःच्या बाबतीत मनाची विचलित अवस्था आता संपली असे सांगतो.

या सर्वांवरून भगवद्गीता ही सर्व प्राणिमात्रांना उद्देशून, परंतु या ठिकाणी अर्जुनाला निमित्त करून सांगितली असे शंकरचार्यांनी म्हटले आहे, ते अत्यंत सार्थ वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या