मुख्यमंत्री फडणवीस, महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचे पाप करू नका!

50

श्रीपाल सबनीस यांनी ठणकावले

पु. भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली), दि. 3 (प्रतिनिधी) – स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची घंटा वाजतेय. विदर्भाचा सवतासुभा निर्माण करू नका. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचे पाप करू नका, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यासपीठावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठणकावले. बेळगावमधील मराठी माणूस यातना भोगत असून त्याचं अक्षरशः प्रेत बनलं आहे. या मराठी माणसांना दिलासा देण्यासाठी सरकारने एखादी योजना आखावी, असे आवाहनही त्यांनी केले.

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी डोंबिवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे, माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आदी उपस्थित होते.

 

माहिती-तंत्रज्ञानाची भाषा मराठी झाली

तरच मराठी शाळा टिकतील -मुख्यमंत्री

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पु. भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली), दि. 3 (प्रतिनिधी) – मराठी शाळांबद्दल विविध स्तरांतून व्यक्त होणारी चिंता योग्य असून केवळ अनुदानाच्या टेकूवर या शाळा टिकणार नाहीत. अनुदान देणे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर ज्ञानभाषा मराठी होणे गरजेचे आहे. मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हे मुलांना लवकर कळते. माहिती-तंत्रज्ञान व ज्ञानाची भाषा मराठी झाली तरच मराठी शाळा टिकतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हजारो मराठीप्रेमी व साहित्यिकांच्या उपस्थितीत झाले. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मराठीने, महाराष्ट्राने साहित्य संमेलनाची परंपरा जिवंत ठेवली आहे असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील बारा प्रमुख भाषांमध्ये मराठीचा समावेश असून उपभाषांनाही तिने समृद्ध केले आहे. मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळांची स्थिती चिंतादायक असून 21 व्या शतकातील मूल्यांची सांगड घालून मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे. साहित्यिकांच्या पाठीशी सरकार यापुढे ठाम उभे राहणार असून दोघांमध्ये संवाद होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

माझ्या भाषणाचे स्क्रीप्ट आयोगाने मागितले नाही हे नशीब!

निवडणूक आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास येतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, आचारसंहितेमुळे येता येईल की नाही असा संभ्रम माझ्याही मनात निर्माण झाला होता. कधी कधी आचारसंहितेचा देखील अतिरेक होतो. पण आयोगाने इथे येण्याची परवानगी दिली हे माझे नशीब. मात्र त्यांनी माझ्या भाषणाचे स्क्रीप्ट तपासण्यासाठी मागवले नाही याबदद्ल आयोगाचे आभार.

27 गावांचा प्रश्न आचारसंहितेनंतर सोडवू!

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी आपल्या भाषणात 27 गावांचा प्रश्न सोडवा असे आवाहन केले होते. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, कल्याण-डोंबिवलीवासीयांच्या ज्या भावना आहेत त्याच माझ्याही असून आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.

साहित्य संमेलन म्हणजे भाषा व संस्कृतीचा वटवृक्ष असून मराठीच्या विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपल्या भाषणात केले. संमेलनचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाकडून मिळत असलेले 25 लाखांचे अनुदान अपुरे असून ते एक कोटी करावे अशी जाहीर मागणी जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.  मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे, शाम मनोहर यांसारखे ‘नोबल’ पुरस्काराच्या पात्रतेचे अनेक साहित्यिक असून त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजीत अनुवाद होण्याची गरज आहे. अशा प्रकारचे अनुवाद झाले तरच  मराठी साहित्य वैश्विक पातळीवर पोहोचेल असे परखड मत ज्येष्ठ हिंदी कवी विष्णू खरे यांनी व्यक्त केले. लेखकांचे रक्षण करण्याची जबाबदारी वाचक व सरकारची असून सरकारने साहित्यिकांना आर्थिक मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.

साहित्यिक उपक्रमांसाठी मदत करा -महापौर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 27 गावे राहिली काय व न राहिली काय आम्हाला फरक पडत नाही, पण येथील साहित्यिक उपक्रमांसाठी सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आपल्या भाषणात केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता संपल्यावर तुम्ही मागाल ते देऊ असे आश्वासन दिले.

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहताच उपस्थितांतमधून बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा एकच गगनभेदी नारा घुमला. त्याचवेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘हो, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजून या मागणीला समर्थन द्या असे आवाहन करताच टाळ्यांचा जोरदार गजर झाला. अवघा महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचा जबरदस्त विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

आपली प्रतिक्रिया द्या