श्रीरामपूर तालुक्यात बाहेरून आलेले सात हजारांहून अधिक जण क्वारंटाईन

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शनिवार अखेर एकट्या श्रीरामपूर तालुक्यात बाहेरून आलेल्या सात हजार 643 जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. यातील 860 व्यक्तींचे गावपातळीवर संस्थांतर्गत विलीगीकरण करण्यात आले आहे. त्यात परदेशातून आलेले 31 तर राज्याबाहेरून आलेल्या 228 जणांचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यासह राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. तरीदेखील अनेक जण शहरासह तालुक्यात परतले. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्यांना घरगुती तसेच संस्थांतर्गत क्वारंटाईन केले. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत त्यांची माहिती घेण्यात आली. त्यानंतर संबंधितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले गेले. संबंधितांनी आरोग्य अॅपद्वारे प्रशासनाला रोज माहिती देण्याची सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांची दैनंदिन माहिती घेतली जात आहे.

तालुक्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींपैकी शहरातील 20 तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बेलापूरला पाच, माळवाडगावला एक, टाकळीभानला तीन व उंदिरगावला दोन व्यक्तींचा समावेश आहे. तसेच राज्याबाहेरील आलेल्यांमध्ये शहरात 55, बेलापूर 39, माळवाडगाव 20, खैरी निमगाव 30, पढेगाव 34, टाकळीभान 18 व उंदिरगावला 32 अशा 228 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील दिल्ली, पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद, औरंगाबाद, मुंबई आदी ठिकाणाहून एकुण पाच हजार 991 जण शहरासह तालुक्यात दाखल झाले आहेत. तर तालुक्याच्या बाहेरून एक हजार 393 जण आले आहेत. माळवाडगाव व खैरानिमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एक हजाराहून अधिक जण जिल्ह्याबाहेरून आले आहेत.

शहराबरोबरच तालुक्यात क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींची दैनंदिन माहिती देण्याचे आदेश प्रशसनाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक आरोग्य केंद्राकडून रोज माहिती मागविली जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रांकडून ही माहिती संकलीत केली जात असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या