अभिनव कोहलीने मारहाण केली नाही, श्वेता तिवारीच्या मुलीचा खुलासा

1067

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिचा पती अभिनेता अभिनव कोहली याच्याविरुद्ध रविवारी तक्रार दाखल केली होती. आपली मुलगी पलक हिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी श्वेताला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्यावर बोलण्यासाठी आता श्वेताची मुलगी पलक ही समोर आली असून तिने एका पोस्टद्वारे या प्रकरणाविषयी सांगितलं आहे. अभिनव कोहलीने तिला कधीच मारहाण केली नसल्याचं पलकचं म्हणणं आहे.

पलकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. अनेक माध्यमांनी लैंगिक शोषण, मारहाण असे मुद्दे श्वेताने तिच्या तक्रारीत केल्याचं म्हटलं होतं. ते खोडून काढत पलकने असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माझ्या आईने नव्हे तर मी त्यांचे (अभिनव) अपशब्द सहन केले आहेत. मला किंवा माझ्या आईला त्यांनी कधीच मारहाण केली नाही. माझं शारीरिक शोषणही केलं नाही. फक्त ते बऱ्याचदा अतिशय अश्लाघ्य आणि त्रासदायक वक्तव्य करतात. या गोष्टी फक्त मी आणि माझ्या आईलाच माहीत आहेत. अन्य कुण्या स्त्रीने ती विधानं ऐकली तर तिला आपल्या वडिलांविषयी लाज वाटू शकते. कारण, पुरुषांकडून अशा शब्दांची अपेक्षा कुणीही करणार नाही, असं पलक तिवारी हिने स्पष्ट केलं आहे.

पलकने तिच्या आईविषयी सांगताना म्हटलं की, मला तिची मुलगी असल्याचा अभिमान आहे. मी माझ्या आईसोबत खंबीरपणे उभी आहे. ती एक अतिशय सशक्त व्यक्तिमत्वाची स्त्री आहे आणि माझ्यासाठी सर्वात आदरणीय व्यक्तीही. त्यांना समाजात वावरण्यासाठी कोणत्याही पुरुषाच्या आधाराची गरज नाही, असं सांगत पलकने श्वेता तिवारी हिला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या