शिवसेनेकडून सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; घटनापीठाने शिंदे गटासमोर उपस्थित केला प्रश्न

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही सुटला नसून सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर युक्तीवाद सुरू आहे. शिवसेना आणि शिंदेगट अशा दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करण्यात येत आहे. यावेळी पाच सदस्यीय घटनापीठाने शिवसेना पक्षाच्या चिन्हासंदर्भात युक्तिवाद करा, असे आदेश देण्यात येताच शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेत विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या आमदारांचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. जोरदार युक्तीवाद करत त्यांनी सर्व राजकीय घडामोडी न्यायालयासमोर मांडल्या.

यावेळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडून गेल्या आहेत. त्यामुळे प्रथम आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय झाला पाहिजे, असे कपिल सिब्बल म्हणाले. त्यावर टिपण्णी करतेवेळी घटनापीठाने शिंदे गटाच्या कृतीवर सवाल उपस्थित केला.

‘एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले’, असा सवाल उपस्थित केला. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून की आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले होते, असा सवाल घटनापीठाने विचारला. यावर कपिल सिब्बल यांनी म्हटले की, हाच मूळ मुद्दा आहे. प्रथम एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकारात निवडणूक आयोगाकडे गेले होते, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यावर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असे घटनापीठाने म्हटले.

त्यानंतर सिब्बल यांनी पु्न्हा पक्षांतरबंदीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर घटनापीठाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घेताना विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारच्या कक्षेचा विचार करावा लागेल, असे म्हटले आहे. शिवसेनेकडून सिब्बल जोरदार युक्तीवाद करत असल्याने शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे.