शहीद औरंगजेब याचे दोन भाऊ सैन्यात दाखल

84

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरच्या पुलवामा येथे गेल्या वर्षी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या औरंगजेब याचे दोन भाऊही आता सैन्यात दाखल झाले आहेत. मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर अशी या दोन तरुणांची नावं आहेत. आपला मुलुख आणि हिंदुस्थान यांचं संरक्षण करण्यासाठी आणि भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही लष्कराच्या सेवेत दाखल झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

सोमवारी राजौरी येथे झालेल्या एका एनरोलमेंट संचलनात या दोघांनीही सहभाग घेतला होता. या प्रसंगी औरंगजेब यांचे पिता मोहम्मद हनीफ हेही उपस्थित होते. माझ्या मुलाला दहशतवाद्यांनी फसवून मारलं. जर तो युद्ध करून शहीद झाला असता तर मला अजिबात दुःख झालं नसतं. पण, त्याचं अपहरण करून त्याची हत्या केली गेली. आता माझे अजून दोन मुलगे सैन्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाने माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. पण, माझ्या मनात एक भळभळती जखम आहे. माझ्या मुलाला ठार मारणाऱ्यांना मीच शिक्षा द्यावी असं माझं मन सांगतं. पण आता माझे दोन मुलगे त्यांच्या भावाच्या हत्येचा बदला घेतील, असं हनीफ यांचं म्हणणं आहे.

मोहम्मद तारिक यानेही मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माझ्या भावाने देशासाठी प्राणार्पण केलं आणि आपल्या रेजिमेंटचं नाव मोठं केलं. त्याच्याप्रमाणेच आम्ही चांगलं काम करू आणि देशासाठी जीवही द्यायला लागला तरी मागे हटणार नाही, असं तारिक याने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या