सिद्धेश्वर झाडबुके साकारणार तमाशातला नाच्याची भूमिका

सामना ऑनलाईन । मुंबई

तमाशा या पारंपरिक लोककलेचा प्राण म्हणजे नाच्या. गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांतून किंवा अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटातून नाच्याची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारली. हाच नाच्या आता छोट्या पडद्यावर येणार आहे. हरहुन्नरी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके नाच्याच्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. स्टार प्रवाहच्या गोठ या मालिकेत नाच्याची एंट्री होणार आहे. बयोआजीचा भाऊ असलेला हा नाच्या ‘बाबी’ म्हापसेकरांच्या घरात काय करामती करतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांतून नाच्या पाहिला असला, तरी छोट्या पडद्यावर ही व्यक्तिरेखा कधी पहायला मिळाली नाही. ही उणीव आता गोठ मधील बाबीच्या रूपाने पूर्ण होणार आहे. बयोआजीचा भाऊ असलेला हा बाबी सिनेमा आणि तमाशाच्या वेडापायी लहानपणीच घरातून पळाला. काही वर्षं तमाशात नाच्या म्हणून तो वावरला. बायकी अंगानं वावरणारा हा बाबी भलताच बेरकी आहे. आपलं इप्सित साध्य करण्यासाठी विविध डाव खेळतो. आता तो बऱ्याच वर्षांनी पुन्हा बयोआजीकडे परतला आहे.

तो स्वत:हून आला आहे, की त्या मागे काही वेगळा हेतू आहे हे कळायला काही मार्ग नाही. मात्र, त्याच्या येण्यानं म्हापसेकरांच्या घरात वादळ येणार हे नक्की आहे. त्याच्या कुरघोड्यांना कोण बळी पडणार हे फक्त त्यालाच माहीत आहे. एकीकडे, विलास आणि राधा यांच्यातलं पती-पत्नीचं नातं छान रंगत असताना बाबीचं परतून येणं हे धोकादायक ठरणार आहे. परतून आलेला बाबी म्हापसेकरांच्या घरात काय डाव खेळतो, त्यासाठी त्याला कोणाची साथ मिळते, या बाबीमुळे ‘विरा’ला काय सहन करावं लागतं, हे जाणून घेण्यासाठी न चुकता पहा ‘गोठ’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर!

आपली प्रतिक्रिया द्या