आईची हत्या करणाऱ्या सिद्धांत गणोरे याचा जामिनासाठी अर्ज

42

सामना प्रतिनिधी, मुंबई

आपल्या जन्मदात्या आईची निर्दयपणे हत्या केल्याप्रकरणी गेल्या एका वर्षापासून तुरुंगात खितपत पडलेल्या सिद्धांत गणोरे या पोलीस अधिकाऱयाच्या मुलाने आता मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याने आपण आपल्या बचावासाठी युक्तिवाद करण्यास असमर्थ आहोत. त्याचा सारासार विचार करून न्यायालयाने आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी गणोरे याने उच्च न्यायालयाकडे केली आहे. मात्र त्याच्या अर्जावर आज कोणतेही आदेश न देता न्यायमूर्तींनी याप्रकरणाची सुनावणी येत्या ५ जूनपर्यंत तहकूब केली.

प्रभात कॉलनी सांताक्रुझ पूर्व येथे राहणाऱया २१ वर्षीय सिद्धांतने त्याची आई दीपाला हिची २३ मे २०१७ साली चाकूने भोसकून हत्या केली होती. हे भीषण कृत्य केल्यानंतर त्याने आईच्या मृतदेहाशेजारी तिच्याच रक्ताने संदेश लिहून स्माईलीही काढली होती. याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या सिद्धांतचे वडील ज्ञानेश्वर हे पोलीस अधिकारी असून सिद्धांतच्या सुटकेसाठी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

या अर्जात त्यांनी त्याचे मानसिक संतुलन ढासळल्याचा दावा केला होता. परंतु सिद्धांतला कोणताही मानसिक आजार झालेला नाही, असा अहवाल जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोर्टात सादर केल्याने सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे सिद्धांतने जामीन मिळावा म्हणून हायकोर्टात धाव घेतली. मानसिक स्थिती ठीक नसलेले आरोपी आपली बाजू मांडण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे अशा आरोपींची सुटका करण्याबाबत कलम ३३० मध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्याआधारावर आपली सुटका करण्यात यावी अशी विनंती सिद्धांतने न्यायमूर्तींसमोर आज केली. न्यायालयाने याबाबतची सुनावणी ५ जूनपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या