अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्याच्या इंजिनिअरचा मृतदेह सापडला; तब्बल महिनाभर सुरू होती शोधमोहिम

महिनाभरापूर्वी अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्याच्या इंजिनिअरचा मृतदेह शोधण्यास अमेरिकन रेंजर्सना यश आले आहे. अमेरिकेच्या मोंटाना राज्यातील ग्लेशियर नॅशनल पार्कमधील खाडीत 6 जुलै रोजी हा तरुण वाहून गेला होता. सिद्धांत पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. गेला महिनाभर अमेरिकन रेंजर्सकडून सिद्धांतचा शोध सुरु होता. सिद्धांतचा मृतदेह पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुरुवारपर्यंत मृतदेह पुण्यात येण्याची शक्यता आहे.

मूळचा पुण्यातील रहिवासी असलेला सिद्धांत पाटील हा नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत होता. सिद्धांत 6 जुलै रोजी आपल्या सात मित्रांसह अमेरिकेच्या मोंटाना राज्यातील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये पिकनिकला गेला होता. तेथे गेल्यानंतर सिद्धांतने आईला मॅसेज मित्रांसोबत पिकनिकला आल्याचे सांगितले. यानंतर मोबाईल बंद करुन लॉकरमध्ये ठेवला आणि मित्रांसोबत खाडीमध्ये हायकिंगला गेला.

हायकिंगदरम्यान तोल जाऊन सिद्धांत खाडीत पडला आणि बेपत्ता झाला. अमेरिकेत एनजीओ चालवणारे प्रेम भंडारी आपल्या संपर्कात आहेत आणि मृतदेह परत आणण्यासाठी ते औपचारिकता पूर्ण करतील, असे सिद्धांतचे मामा प्रितेश चौधरी यांनी सांगितले.