आम्ही खवय्ये-सिद्धार्थ चांदेकर

सामना ऑनलाईन, मुंबई

सिद्धार्थ चांदेकर याला जसं रस्त्यावरचं चटपटीत आवडतं… तितकाच आईच्या हातचा वरणभातही आवडतो.

– ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – खाणं ही एक प्रक्रिया आहे, पण स्वयंपाक आणि उत्तम जेवण ही माझ्यासाठी जगण्याइतकीच महत्त्वाची गोष्ट आहे.

– खायला काय आवडतं? – मराठी जेवण आवडतं.

– चमचमीत की साधं – चमचमीत जास्त आवडतं.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – नक्कीच घेतो. आपण घरचं जेवण जितकं जास्त जेवू तितकं जास्त चांगलं आहे. घरात जेवणात वेगवेगळे पदार्थ वापरले जातात. आणि असं नाही की, डाएट करण्यासाठी जगावेगळंच काही खायचं. लहानपणापासून तुम्ही पोहे, उपमा खात असाल तर तेच खायचं फक्त त्याचं प्रमाण ठरवायचं. त्यामुळे सगळ्यात चांगलं डाएट घरच्या घरी जेवणं.

– डाएट करता का? – हो. गरज असेल तेव्हा करतोच.

– आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – एखाद-दुसऱया वेळेला. त्याहून जास्त नाही.

– कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा स्ट्रीट फूड आवडतं.

– कोणतं पेय आवडतं? – फारसं नाही.

– प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता? – सांभाळावं लागतं. महत्त्वाचं  म्हणजे जे आमचे नियोजक असतात त्यांच्याकडून आम्हाला चांगलं जेवण मिळतं.

– प्रयोगादरम्यान काय खायला प्राधान्य देता – प्रयोगादरम्यान आम्ही चणेफुटाणे खातो. पोट भरायला त्याचा त्रास होत नाही.

– स्ट्रीट फूड आवडतं का? – पाणीपुरी, रगडा पुरी प्रचंड आवडतं.

– घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – आईने केलेला वरणभात, चकोला ते मला आवडतं.

– जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा? – मी बिर्याणी, कांदा, टोमॅटो, बटाटय़ाचा रस्सा छान करतो.

मुगाच्या डाळीची खिचडी

कांदा चिरायचा. कुकरमध्ये थोडंसं तूप घालायचं. त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा. त्यावर जिरं, मोहरी घालायची. बटाटा, फ्लॉवर, कोबी हव्या त्या भाज्या घालायच्या. नंतर गोडा मसाला, गरम मसाला लसूण घालायचा. मुगाची डाळ आणि तांदूळ आधीच धुऊन भिजवून ठेवायचे. ते यात घालायचं. मीठ आणि तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी घालायचं. तीन शिटय़ा झाल्या की, खिचडी तयार.