स्वयंसिद्ध… सिद्दी

17

डॉ. गणेश चंदनशिवे, [email protected]

सिद्दी… आदिवासी. मूळ आफ्रिकेकडील ही जमात आपल्याकडे मुरुड-जंजिरा भागात आढळते.. त्यांची खास स्वतःची अशी वैशिष्टय़े आहेत…

जागतिकीकरणाच्या युगात शहरापासून आजही हजारो किलोमीटर लांब असणाऱया आदीम संस्कृतीला पंचमहाभूतांची भीती वाटते. या भीतीपासून त्यांची सुटका व्हावी म्हणून सिद्दी आदिवासी लोकगायन नृत्याद्वारे देवपुजेतून इष्टदेवतेस साकडे घालताना दिसतात. सिद्दी आदिवासी लोक देवता पूजनासाठी जी नृत्यशैली वापरतात त्याला सिद्दीगोमा असे नाव आहे. सिद्दी हे आदिवासी मुस्लिम धर्मीय असून त्यांची मातृभाषा स्वाहिली आहे. कालमानपरत्वे आधुनिक काळात जगाशी संवाद साधताना ते हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी भाषेचा वापर करतात. केंद्र सरकारने सिद्दींना भटक्या विमुक्तांचा दर्जा दिला आहे. सिद्दीगोमा मुस्लिम धर्माशी नातेसंगत असल्याने त्यांची गायकी किंवा ठेका हा सुफी संगीतासारखा असतो. सिद्दीगोमा हा नृत्य प्रकार आफ्रिकन नृत्य प्रकाराशी तादात्म्य साधणारा आहे.

शहरापासून दूर घनदाट अरण्यात शिकार करून आल्यानंतर आनंददायी महोत्सवाच्या वेळी जे जल्लोषाचे वातावरण तयार होते व त्या वातावरणात वाद्यांचा गजर करून नृत्य सादर केले जाते त्याला सिद्दीगोमा असे म्हणतात. गोमा म्हणजे ‘वाद्य’ सिद्दी जमातीचे लोक वेशभूषा करताना मोरपिसांचा स्कर्ट, चेहऱयावर पांढऱया, हिरव्या, लाल रंगाच्या पट्टय़ाचे लेप लावून रंगभूषा करतात. सिद्दींची रंगभूषा आकर्षक व भडक असते. कमरेला कवडय़ाचा कमरपट्टा, दंडात कवडय़ांचे ताईत, डोक्यावर कवडय़ांचा मोरपिसे खोवलेला टोप, पायात कवडय़ांच्या पट्टय़ा अशी आकर्षक वेशभूषा असते. मोगारमान नावाच्या चार फूट उंचीच्या प्रमुख वाद्यावर आफ्रिकन ठेका वाजविला जातो. या वाद्याच्या जोडीला एक तंतुवाद्य असते. त्याला ‘मलुंगा’ असे म्हणतात.

मलुंगा आपल्याकडील धनुष्यबाणासारखे दिसणारे वाद्य आहे. उजव्या हातात खुळखुळा व दोन बोटांच्या चिमटीत बांबूंच्या काडीने मलुंगावर आघात केला जातो. त्यातून तंतुवाद्याचे स्वर बाहेर पडतात. जसे आपल्याकडील तुणतुणे या वाद्यातून ‘टुंई टुंई’ असा आवाज येतो. तसाच आवाज मलुंगा या वाद्यातून येताना जाणवतो. आधुनिक पाश्चिमात्य जेंबे वाद्यासारखे वाद्य सिद्दी गळय़ात अडकवून वाजवतात. त्याला मुसिंदू असे म्हणतात. नारळापासून तयार केलेले मायमिशा वाद्य आणि संबळासारखे धमामा हे चर्मवाद्य. या वाद्यांवर ठेका धरल्यानंतर कलावंतासहित प्रेक्षकांनासुद्धा झिंग येते. वाद्याच्या गजरावर शरीराच्या लवचिक हालखाली व कसरतीचे प्रयोग करणे हे सिद्दीगोमा नृत्याचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. साधारणतः बारा जणांचा चमू सिद्दीगोमा नृत्य सादर करते. वाद्य आणि गाण्याबरोबर चित्रविचित्र चित्कार करत सिद्दीगोमामध्ये हवेत उंच एकामागे एक नारळ फेकून ते डोक्याने फोडतात, जळत्या कोळशावर अनवाणी पायाने नाच करतात, माकडांची आणि प्राण्यांची हुबेहूब नक्कल करून घटना साकारतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या