मुंबई पोलिसांना ‘बाप्पा’ पावला,नागपाडा रुग्णालयाला सिद्धिविनायक मंदिराकडून दीड कोटी

467

मुंबई पोलिसांना ‘बाप्पा’ पावला आहे. पोलिसांच्या आरोग्याला प्राधान्य देत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पोलिसांच्या नागपाडा रुग्णालयाला दीड कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. हा निधी रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी देण्यात आला आहे.

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराने विशेष बाब म्हणून 1.5 कोटी रुपये नागपाडा रुग्णालयाला दिले आहेत. या निधीतून नागपाडा पोलीस रुग्णालयासह अन्य 12 पोलीस रुग्णालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी केली जाणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने केलेल्या या अर्थसहाय्यामुळे मुंबई पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे विधी व न्याय विभागाने अध्यादेश काढत मंदिर न्यासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

सदर निधी खर्च करण्याआधी वैद्यकीय उपकरणे हाताळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ व पायाभूत सुविधा तसेच तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत का याची मंदिर न्यासाकडून खात्री करण्यात येणार असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या