
बदलत्या जीवनशैलीमुळे किडनी विकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर डायलेसिससारख्या प्रदीर्घ आणि महागडय़ा उपचारांची गरज असते. त्यामुळे किडनीग्रस्त रुग्णांना माफक किमतीत डायलेसिसची सुविधा उपलब्ध होण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने धारावीत दहा खाटांचे सिद्धिविनायक डायलेसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. राज्याच्या विधी व न्याय खात्याने याबाबत निर्णय जाहीर केला आहे.
सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने मंदिराच्या मागील बाजूस बारा खाटांचे डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले. गोरेगाव प्रबोधन संस्थेमध्ये आठ खाटांचे डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले. अशाच प्रकारे मुंबईत दररोज तीनशे रुग्णांना 100 मशिन्सवर तीन पाळय़ांमध्ये डायलेसिस उपचार उपलब्ध करून देण्याची सिद्धिविनायक मंदिर व राज्य सरकारची योजना आहे. कारण डायलेसिस उपचार खर्चिक व प्रदीर्घ असल्याने बहुतांश रुग्ण दीर्घकालीन उपचार न घेता मध्येच उपचार सोडून देतात. किडनीग्रस्त रुग्णांची शारीरिक परिस्थिती विचारात घेता हे रुग्ण घराच्या जवळच्या डायलेसिस सेंटरमध्ये उपचार घेणे पसंत करतात. त्यामुळे मंदिर न्यासाने मुंबईच्या विविध भागात धर्मादाय संस्था व सेवाभावी संस्थेच्या वतीने डायलेसिस सेंटर सुरू करण्याची योजना आहे.
85 लाख रुपये दरवर्षाला खर्च
या योजनेचा एक भाग म्हणून सिद्धिविनायक मंदिर व धारावीतील साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या वतीने दहा खाटांचे डायलेसिस सेंटर सुरू करण्यास राज्याच्या विधी व न्याय खात्याने मान्यता दिली आहे. या सेंटरमध्ये रुग्णाकडून सवलतीच्या दरात अडीचशे रुपये आकारण्यात येतील, तर एका रुग्णाच्या मागे मंदिर न्यास 900 रुपये खर्च करणार आहे. दहा खाटांच्या या सेंटरमध्ये दरवर्षी 9 हजार 360 रुग्णांवर डायलेसिस करण्यात येईल. त्यासाठी न्यासावर दरवर्षाला 85 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. न्यासाच्या अर्थसंकल्पात वैद्यकीय प्रकल्प व डायलेसिसवरील दैनंदिन खर्चासाठी दीड कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.