‘सुपरहीरो’ सिद्धार्थची जादू चालतेय!

54

अभिनेता सिद्धार्थ जाधव याचे  ‘गेला उडत’ हे आणखीही कॉमेडी नाटक गर्दी खेचतंय. वर्षभरात १७० प्रयोगांचा टप्पा ‘गेला उडत’ने पार केला आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केदार शिंदे यांचे आहे. केदार आणि सिद्धार्थ ही जोडी १३ वर्षांनी एकत्र आलीय. यापूर्वी दोघांनी ‘लोच्या झाला रे’ केले होते. स्वत सिद्धार्थ साडेचार वर्षांनी म्हणजे ‘जागो मोहन प्यारे’नंतर रंगभूमीवर आला आहे. त्यामुळे ‘गेला उडत’ नाटक त्याच्यासाठी खासच आहे. खरं तर ‘गेला उडत’च्या वनलाइनवर चित्रपट तयार करायचा केदारचा विचार होता. पण सिद्धार्थसाठी त्याने नाटक तयार केलं आणि तेव्हापासून नाटक धुडगूस घालतंय. त्यातील सिद्धार्थची मारुती कदम ही व्यक्तिरेखा स्वतला सुपरहीरो समजणारी आहे. सारे प्रॉब्लेम्स आपण एका चुटकीसरशी सोडवू असे त्याला वाटते आणि तो धम्माल करतो. पण त्याच्यावर संकट येतं आणि त्याला कळून चुकतं की तो सुपरहीरो नाही, सर्वसाधारण मनुष्य आहे. पुढे मारुतीमधील सुपरहीरोचे काय होतं हे नाटकातच बघावे. प्रसाद कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन’च्या ऍक्शन, फुल ऑन ड्रामा, इमोशन्सने भरलेल्या ‘गेला उडत’चे प्रयोग २५० रुपयांचा ठसठशीत आकडा दाखवून जोरात सुरू आहेत.

अर्धशतकानंतर दमदार वाटचालीचा विश्वास

अभिनेता, दिग्दर्शक संतोष पवार याच्या ‘आलाय मोठा शहाणा’ या नाटकाने ५० प्रयोगांचा टप्पा पार करण्याचे आव्हान याच आठवडय़ात पार केलंय. जीएसटी असो वा आणखी काही, डोक्याला जराही शॉट लावून घ्यायचा नसेल, नुसतं टेन्शन फ्री व्हायचं असेल तर ‘आलाय मोठा शहाणा’ हा उत्तम पर्याय आहे. हसून हसून झिंगाट नाही झालात तर जीएसटीसकट पैसे परत मिळतील याची खात्री बाळगा. संतोष पवारचा स्वतचा असा चाहतावर्ग आहे. दिग्दर्शन आणि अभिनय अशा कसरती काही त्याच्यासाठी नवीन नाहीत. लेखक वैभव परब यांच्या वाक्यावाक्याला हशा आणि  शाब्दिक कोटय़ांना टाळय़ा मिळवून देणाऱया संहितेला संतोषचा टच लाभून नाटक धम्मालच्या पलीकडे पोहचले आहे. श्रीमंत दादासाहेब यांची एकुलती एक लाडावलेली, सिनेमाचे वेड असलेली कन्या सिंड्रेला ही पाच वर्षे प्रयत्न करूनही साधी एसएससी पास होऊ शकलेली नाही. तिला शिकवण्यासाठी दादासाहेब गावातील एका मास्तरला पोत्यात कोंबून जबरदस्तीने घेऊन येतात. सिंड्रेला पास झाल्याशिवाय तिचे लग्न होणार नसते. तिचे अँटीक कुटुंब, तिच्या डोक्यातील सिनेमाचं भूत वा घरातील आधीच्या मास्तराचं भूत अशा सापळ्यातून मास्तर स्वतला सोडवतात का, सिंड्रेला पास होते का या उत्तरांसाठी  ‘आलाय मोठा शहाणा’ बघायलाच हवा. नाटकातील मास्तर आणि विद्यार्थ्यांमधील गमतीदार बंध प्रेक्षकांना बांधून ठेवतो एवढं नक्की. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं ‘आलाय मोठा शहाणा’चे प्रयोग काहीसे धीम्या गतीने सुरू असल्याचे संतोष मान्य करतो. यामागे त्याची स्वतची कारणं आहेत. आधी आशीष पवार हा मास्तराची भूमिका करायचा. काही कारणांमुळे तो नाटकातून बाहेर गेल्यावर संतोष यांना स्वतचे सर्व व्याप सांभाळून प्रयोग करावे लागत आहेत, मात्र प्रेक्षकांची अशीच साथ लाभली की शंभरचा पल्ला लवकर गाठू हा विश्वास संतोषने व्यक्त केलाय.

लाखाचे बुकिंग ठरलेले!

एकदा बघून दिल भरणार नाही असे ‘के दिल अभी भरा नहीं’ नाटक. लीना भागवत आणि मंगेश कदम या जोडगोळीने १३५ प्रयोगांचा टप्पा पार करून दीडशतकी वाटचाल सुरू केली आहे. उतारवयातील भावनिक गरजांचे महत्त्व सांगणारे, काहीसे अंतर्मुख करणारे, तितकंच हसत हसत टपल्या मारणारे असं हे नाटक आहे. या आधी रिमा लागू आणि विक्रम गोखले या जोडीने ‘के दिल अभी भरा नहीं’चे ७४ प्रयोग केले होते. नोटाबंदी आणि जीएसटी यावर मात करून  नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. नाटकाचा स्वतचा असा सुशिक्षित प्रेक्षकवर्ग आहे. आजही नाटकाचे एक लाख, सव्वा लाखाचे बुकिंग ठरलेले असल्याचे मंगेश कदम सांगतात. नाटक बघून लोक टाळ्या वाजवतात वगैरे कॉमन असते, पण ‘के दिल अभी भरा नहीं’ नाटकातील प्रसंगावर प्रेक्षक रिऍक्ट होतात, ‘बरोबर आहे’, ‘असंच पाहिजे’ अशी डायलॉगबाजी करतात हेच नाटकाचे यश असल्याचे लीना आणि मंगेश सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या