नगर जिह्यातील एचआयव्हीबाधित रुग्णसंख्येत लक्षणीय घट, 20 वर्षांपूर्वी 31 टक्के असलेली संख्या आता 0.3 टक्क्यांवर

प्रबोधन, प्रचार आणि जागरुकता यामुळे नगर जिल्ह्यात 2002 मधील एचआयव्हीबाधितांचे 31 टक्के असणारे प्रमाण आता 2022 मध्ये 0.3 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश आले आहे. जिल्ह्यात सध्या 21 हजार 613 रुग्ण असून, यापैकी 10 हजार 500 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात नियमित उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्यामार्फत जिल्हा रुग्णालयात एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार देण्यात येत आहेत. जिह्यात एचआयव्हीच्या चाचणीसाठी 28 आयसीटीसी केंद्र कार्यरत आहेत. तसेच 87 पीपीपी एफआयसीटीसी केंद्र, 99 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10 शहरी आरोग्य केंद्र, 2 जेल एफआयसीटीसी केंद्र कार्यरत आहे. जिह्यात दर महिन्याला 30 ते 35 हजार रुग्णांची एचआयव्हीची तपासणी करण्यात येते. यात बाधित सापडण्याचे प्रमाण कमी आहे. तर, दर महिन्याला 5 ते 7 हजार गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी जिल्हाभरात करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यात 2002 मध्ये एचआयव्ही बाधितांची टक्केवारी 31 टक्के होती. त्यानंतर 2003 मध्ये ही टक्केवारी 38 टक्के झाली. साधारणपणे 2009 पासून एचआयव्हीबाधितांच्या टक्केवारीत घट येण्यास सुरुवात झाली. 2020 मध्ये एचआयव्हीबाधितांची टक्केवारी शून्य टक्क्यांच्या खाली गेली. जिल्ह्यात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमात नवीन पिढीमध्ये एचआयव्हीचा संसर्ग जाऊ नये म्हणून ईएमटीसीटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात प्रत्येक गरोदर मातेची तपासणी करून संसर्गित माता व नवजात बालकास आवश्यक उपचार दिले जातात. ज्यामुळे संसर्ग जाण्याचे प्रमाण हे 10 टक्क्यांवर होते. मागील पाच वर्षांपासून उपचार पद्धतीत बदल होऊन नवीन पीपीटीसीटी, एमडीआर पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे प्रमाण 3 ते 6 टक्क्यांपर्यंत आणण्यात यश आले आहे.

1 डिसेंबरला जागतिक एड्स दिनानिमित्त नगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात जनजागृती रॅली काढणे, पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन, व्याख्यानमाला, जनजागृती पथनाटय़, स्पर्धा, रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून या विषयावर प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच कामगार, रिक्षा, वाहनचालक, क्लीनर यांच्यासाठीही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचेही डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले.