
हिंदुस्थान आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान या सगळ्याला कारणीभूत असलेल्या खलिस्तान्यांवर शीख समुदाय संतापला आहे. सध्या घडणाऱ्या घटनांवर शीख समुदायाने नाराजी व्यक्त केली असून खलिस्तानवाद्यांमुळे आपला समुदाय आदर गमावत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
यासंबंधी काही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अनेक व्हिडीओही व्हायरल होत असून त्यात शीख बांधव आपली नाराजी जाहीर करताना दिसत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, खलिस्तान्यांना समर्थन करण्यासाठी किंवा तिरंग्याचा अपमान करण्यासाठी आम्ही गुरुद्वारात जात नाही. आम्हाला याची लाज वाटतेय की तिरंग्याचा अपमान केला जात आहे. संपूर्ण जगात शीख हे त्यांच्या पाहुणचारासाठी आणि सेवाभावासाठी ओळखले जातात. पण, या कट्टरतावादी विचारसरणीमुळे शिखांविषयी जगभरातील आदर कमी होत चालला आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण होऊ लागली आहे.
खलिस्तानी हे फक्त फुटीरतेच्या गप्पा करतात. वास्तवात त्यांनी कधीच गुरुग्रंथसाहेबमधील एक अक्षरही वाचलेलं नाही. किंवा कुणीही त्यांना त्याबाबत बोलतानाही पाहिलेलं नाही. त्यांच्या दहशतीमुळे जगभरातील शिखांच्या प्रतिमेला तडा जात आहे, असंही शीख समुदायाचं म्हणणं आहे.