
जास्तीत जास्त मुलं जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना विविध बक्षिसं देण्याचं सिक्कीम सरकारने ठरवलं आहे. मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी ही घोषणा करताना म्हटले आहे की, जास्तीत जास्त मुले जन्माला घालणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जोरथांग शहरात संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. सिक्कीमच्या स्थानिक जाती, जमातींमध्ये मुले जन्माला घालण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना ही घोषणा करावी लागली आहे. अशा प्रकारची घोषणा करणारे सिक्कीम हे देशातील पहिलेच राज्य आहे.
मुख्यमंत्री तमांग यांनी सांगितले की सिक्कीमचा जन्मदर वाढावा यासाठी सरकारी नोकरीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 1 वर्षाची मातृत्व रजा दिली जाते तर पुरुष कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा दिली जाते. यापलिकडे जात आता सिक्कीम सरकारने दुसरे मूल जन्माला घातल्यास एक पट पगारवाढ आणि तिसरे मूल जन्माला घातल्यास दुप्पट पगारवाढ देण्याचा निर्णय प्रस्तावाधीन असल्याचे तमांग यांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्य जोडप्यांनी अधिकाधिक मुलांना जन्म दिल्यास ते आर्थिक मदतीसाठी पात्र ठरतील असे त्यांनी सांगितले. ही मदत कशी असेल याचा तपशील महिला-बालविकास विभाग आणि आरोग्य मंत्रालय मिळून ठरवतील असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री तमांग यांनी सांगितले की सिक्कीममधील सरकारी रुग्णालयात आयव्हीएफची (कृत्रिम गर्भधारणेसाठीचे तंत्रज्ञान) सोय उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेचा अवलंब करून गर्भवती होणाऱ्या महिलांना 3 लाखांचे अनुदान देण्यात येईल. सरकारी रुग्णालयातील आयव्हीएफ सेवेचा वापर करून आतापर्यंत 38 महिला गर्भवती झाल्या असल्याचे तमांग यांनी सांगितले. सिक्कीमची सध्याची लोकसंख्या ही 7 लाखांहून कमी आहे.