Sikkim Snowfall तुफान बर्फवृष्टीत लष्कराचे जवान बनले ‘देवदूत’, 1400 नागरिकांचा वाचवला जीव

यंदा देशाच्या अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी झाली, त्यामुळे पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी पर्यटक अडकल्याच्या बातम्या आल्या. मात्र या तुफान बर्षवृष्टीमध्ये हिंदुस्थानी लष्कराचे जवान देवदुतासारखे धावले. हिंदुस्थानी जवान आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने मार्च महिन्यात बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या 1400 हून अधिक नागरिकांची सुटका केली. सिक्कीममध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते, परंतु यावेळी बर्फवृष्टी थोडी उशिरा सुरू झाली. मात्र पर्यटकांची परिस्थिती बिकट झाली आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, त्रिशक्ती कॉर्पने 11 ते 15 मार्च दरम्यान ऑपरेशन हिम राहत अंतर्गत पूर्व सिक्कीममध्ये मोठे बचाव कार्य केले. ज्यामध्ये बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या 1400 हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली. शुन्याखालील तापमानात त्यांची सुखरूप सुटका केली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला सिक्किममध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे जवळपास 400 नागरिकांना जवानांनी वाचविले आणि त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचार देत अन्नासह आपत्कालीन मदत पुरवण्यात आली होती.

सेनेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी बर्फ हटविण्यासाठी थोडे आव्हान होते. सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे नागरीक आणि लष्कराच्या जवानांना काही करण्यास मनाई होती. 14 हजार – 18 हजार फुट उंच तैनात लष्कराचे जवान बर्फ हटविण्यासाठी प्रयत्न करत होते. हे ऑपरेशन केवळ लष्करासाठीच नव्हे तर स्थानिक आणि पर्यटकांसाठीही होते, जे रस्ते खुले होण्याची वाट पाहत होते.

संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, सिक्कीममधील नाथू ला आणि त्सोमगो (चांगु) तलावांवरून परतत असताना सुमारे 100 वाहनांमधून प्रवास करणारे 400 लोक अडकून पडले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. 17 मार्च रोजीच सिक्कीमच्या वरच्या भागात चांगूमध्ये अडकलेल्या 1000 हून अधिक पर्यटकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते. अधिकृत प्रसिद्धीमध्ये माहिती देताना असे सांगण्यात आले की, परिसरात तैनात असलेल्या सैनिकांनी बचाव कार्य सुरू केले आणि सुमारे 8 तास चाललेल्या या मोहिमेनंतर पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.