सिल्लोड तालुक्यात 55 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा दणदणीत विजय; भाजपला धक्का

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम राहिले असून, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का देत तालुक्यातील ८३ पैकी ५५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रभाकर पालोदकरांना दुसNयांदा धक्का बसला आहे. त्यांच्या गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे.

राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या जोरदार विजयानंतर सेना भवन येथे ढोल ताशा, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची मुक्त उधळण करीत व एकमेकांना लाडू, पेढा भरवून विजयोत्सव साजरा करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, सुदर्शन अग्रवाल, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

तालुक्यातील पालोद, अंभई , घाटनांद्रा, आमठाणा, अजिंठा केरहाळा, बोरगाव सारवाणी आदी प्रमुख ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद विजय मिळवला. तर मंगरूळ, पालोद, अंभई, कायगाव, बाभूळगाव, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, वडाळा, केरहाळा, धानोरा, वडोदचाथा, देऊळगाव बाजार, बोदवड, सराटी इत्यादी ग्रामपंचायतींवर परिवर्तन होऊन येथे शिवसेनेने भाजपला धक्का देत विजय मिळवला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये भाजपचा बुरूज ढासळला; शिवसेनेची मुसंडी, राष्ट्रवादीचीही घोडदौड

तालुक्यात निवडणुकीपूर्वी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ६ पैकी मुखपाठ, पिंपळगाव घाट / शेखपूर, चिंचखेडा, सासुरवाडा व खंडाळा या ५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने बिनविरोध विजय मिळवला होता.

या निवडणुकीत भाजपचे श्रीरंग पाटील साळवे, सुनील मिरकर, गजानन राऊत, काकासाहेब फरकाडे, शंकर माने यांना त्यांच्याच गावात शिवसेनेने धूळ चारल्याने भाजप नेत्याना ग्रामपंचायत निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर भाजपचे माजी आ.सांडू पाटील लोखंडे यांच्या मांडणा गावातही ९ पैकी ४ सदस्य हे शिवसेनेचे निवडून आल्याने मांडणा गावात सुरुंग लावण्याचे काम शिवसेनेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या