पाकिस्तानात ‘गृहयुद्ध’, लष्कराविरोधात सिंध पोलिसांचा उठाव

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा जावई कॅप्टन सफदर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेवरून पाकिस्तानात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. पाकिस्तानी लष्कर हे या असंतोषाच्या केंद्रस्थानी असून लष्कराचा बचाव करणारे पंतप्रधान इम्रान खान हे देखील वादाच्या केंद्रस्थानी ओढले गेले आहेत. पाकिस्तानातील परिस्थिती इतकी खराब झाली आहे की सिंध प्रांतातील पोलिसांनी तिथल्या लष्कराच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात उठाव केला आहे. या उठावामुळे नाचक्की झाल्याने पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांना चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत.

mohammad-safdar

वादाला सुरुवात कुठून झाली?
पाकिस्तानातील सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराचीमध्ये 11 विरोधी पक्षांनी एकत्र येत एक विशाल सभा आयोजित केली होती. 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सभेमध्ये मरीयम नवाज यांनी इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली होती. इम्रान खान हे भेकड आणि लष्कराच्या हातातील बाहुलं बनले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मरीयम नवाज यांनी इम्रान खान यांच्यावर टीका करताना म्हटले की ते आपले अपयश झाकण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या आड लपून बसले आहेत. यामुळे लष्कराची प्रतिमा मलीन होत चालली आहे. मरीयम यांनी या सभेत म्हटले की “जेव्हा तुमच्याकडे उत्तरे मागितली जातात तेव्हा तुम्ही लष्कराच्या मागे लपता. तुम्ही भेकड आहात. तुम्ही लष्कराचे नाव बदनाम केले आहे. ” ही टीका केल्यानंतर मरीयम यांनी पाकिस्तानी सरकारला आव्हान दिलं होतं की हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा.

maryam-and-jardari

मरीयम यांनी या सभेत भाषण केल्यानंतर त्या त्यांच्या पतीसोबत हॉटेलमध्ये निवासासाठी गेल्या होत्या. कराची पोलिसांनी त्याच रात्री मरीयम यांच्या पतीला म्हणजेच मोहम्मद सफदर यांना अटक केली. पोलिसांनी हॉटेलचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असा आरोप मरीयम यांनी केला आहे. या अटकेनंतर पाकिस्तानात मोठा जनक्षोभ उसळला असून चहूबाजूने होणाऱ्या टीकेनंतर पोलिसांनी सफदर यांना सोडून दिले.

maryam-nawaz

सफदर यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे. विरोधक आणि काही माध्यमांनी दावा केला आहे की 18 ऑक्टोबरला सिंध प्रांताच्या पोलीस महानिरीक्षक मुश्ताक महार यांचे पाकिस्तानी लष्कराने अपहरण केले होते. त्यांच्याकडून लष्कराने जबरदस्ती सफदर यांच्या प्रथम खबरी अहवालावर म्हणजेच FIR वर स्वाक्षरी घेण्यात आली आणि त्यानंतर सफदर यांना अटक करण्यात आली. हे दावे होत असतानाच महार यांनी आपण सुट्टीवर जात असल्याचे जाहीर केले. अपहरणाच्या घटनेने ते संतापले असून यामुळेच त्यांनी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. महार सुट्टीवर गेल्यानंतर किमान 70 वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देखील सुट्टीवर गेले आहेत.

pakistan-opposition-leaders

हे अधिकारी सुट्टीवर गेल्यानंतर विरोधक पाकिस्तानी लष्कराविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की कराचीतील घटनेनंतर “पाकिस्तान सरकारने जनमत प्राप्त करून सत्तारुढ झालेल्या प्रांतीय सरकारची खिल्ली उडवली आहे. तुमचे आदेश मानले जावेत यासाठी पोलीस अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले, सैन्याची प्रतिमा मलिन करण्यात आली. संविधानाच्या तुम्ही चिंधड्या उडवल्याचे पोलीस महानिरीक्षकांचे पत्र दर्शवत आहे.”

पाकिस्तानातील विरोधी पक्षाचे बिलावल भुट्टो जरदारी यांनी या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आयएसआयचे प्रमुख फैज हमीद यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला. बिलावल यांच्या पक्षाची सिंध प्रांतात सत्ता आहे. आपली तिथे सत्ता असतानाही सफदर यांच्यावरील कारवाईबाबत आपल्या सरकारला काहीही सांगण्यात आले नाही असे जरदारी यांनी म्हटले आहे. ही अटक एक मोठा कट असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. या अटकेबाबत सिंध प्रांताच्या पोलिसांनाही माहिती नव्हती असं जरदारी यांचं म्हणणं आहे. हे सगळं संशयास्पद असून याची पाकिस्तानी लष्कराने आणि आयएसआयने चौकशी करावी अशी मागणी जरदारी यांनी केली आहे. इतर विरोधकांनीही जरदारी यांच्याप्रमाणे मागणी केली असून त्यांच्या वाढत्या दबावामुळे बाजवा यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या