सिंधुदुर्ग – भात खरेदी-विक्री केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा

शासनातर्फे भात खरेदी वेळेत सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा भात खरेदी-विक्रीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शासनाने यावर्षी 1868 रुपये हमीभाव व 700 रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर केल्यामुळे शेतकऱयांमधून भात खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आठवडाभरापूर्वीच भात खरेदी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या भात विक्रीसाठी रांगा लागल्या होत्या. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आतापर्यंत 758 क्विंटल भात खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे सहा हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 49 भात खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. यात कुडाळ, कणकवली व सावंतवाडीमध्ये काही केंद्रांवर भात खरेदी सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिह्यात 49 भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आल्याने यावर्षी वेळेत भात विक्रीसाठी शेतकऱयांना संधी मिळाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी हमीभावामध्ये 53 रुपयांची वाढ शासनाकडून करण्यात आली होती. यातच नुकताच शासनाने प्रति क्विंटल 700 रुपये हमीभाव जाहीर केल्याने खासगी मिलरला देण्याऐवजी सहकारी सोसायटय़ा व खरेदी-विक्री संघामार्फत सुरू केलेल्या भात खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी शेतकरी पसंती देत आहेत. भात खरेदी केंद्रावर भात दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत असून शेतकऱयांची होणारी फसवणूक व नुकसानही टाळता येणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र खरेदी केलेले भात गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर त्याची मिलरकडून वेळीच उचल होण्याची गरज आहे. अन्यथा काही खरेदी केंद्रांकडून भात खरेदी थांबण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या