
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच खलाशी मासेमारी करायला समुद्रात गेलेले असताना त्यांची नौका अचानक बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्गात खळबळ उडाली आहे. पोलीस, तटरक्षक दल या नौकेचा शोध घेत आहेत.
मालवण तालुक्यातील आचरा येथील मुजफ्फर उर्फ चावल बशीर मुजावर यांची मासेमारी नौका MH 04 MH 2921 ही मासेमारी नौका खलाशांसह अरबी समुद्रातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ही नौका अखेरची दिसली होती. त्यानंतर त्या नौकेची सिग्नल यंत्रणा बंद झाली व तेव्हापासून तिचा काहीच पत्ता नाही. ती सापडत नसल्याने या प्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.