चाकरमान्यांचा ‘हातभार’; सिंधुदुर्गात पडिक जमिनीवरही फुलले भाजीचे मळे!

404

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला जेरीस आणले असताना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबई, पुण्यासारख्या शहरांत असलेल्या चाकरमान्यांनी आपला गाव गाठला. सध्या सगळीकडे हे नागरिक आपल्या कुटुंबासोबत शेतात राबताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची पडिक जमीनही लागवडीखाली येणार आहे, दुसरीकडे तरुण वर्गानेही भाजीपाला लागवड करून उत्पन्नाचे स्रोत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदुस्थानात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून घरात बंदिस्त झालेल्या चाकरमान्यांनी पुटुंब कबिल्यासह आपला गाव गाठला आहे. सिंधुदुर्गात एक लाख पाच हजार लोक दाखल झाले आहेत. सध्या शेतीचा हंगाम जोरदार सुरू असून जिल्हावासीयांना चाकरमान्यांची मदत मिळत आहे. गेली अनेक वर्षे कार्यालयात काम करणारे हात शेतीसाठी जुंपले असलेल्याचे चित्र सध्या सिंधुदुर्गात पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे खंडासाठी, इतर वापरासाठी दिलेल्या जमिनीवरही यंदा धान्य पिकणार आहे.

एकीकडे ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली असताना जिल्हावासीय मात्र आपल्या शेतीसह जोड व्यवसायात व्यस्त आहेत, अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर न पडता घरातच राहून विषाणूचा मुकाबला करायचा, असा निश्चय शेतकऱयांनी केला असावा, अशी स्थिती येथील बाजारपेठा पहिल्यानंतर दिसून येते. देशात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सिंधुदुर्गात मात्र गावातच राहून विषाणूशी दोन हात करत चाकरमान्यांनी शेती उद्योगावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजीपाला, झेंडूची लागवड
शहरातून आलेल्या तरुणांनीही गेली अनेक वर्षे पडिक असलेल्या आपापल्या जमिनीत जून महिन्यापासून भाजीपाला तसेच झेंडूची लागवड केली आहे. येत्या काही दिवसांपासून सणवार सुरू होणार असल्याने त्यांना विक्रीतून आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या